अमळनेर मध्ये बाल साहित्य संमेलनाचे आयोजन, उद्घाटकही बालकच
*जळगाव दि १ — 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला आज बालसाहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या बालसंमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे यात अध्यक्ष, उद्घाटक ही सर्व मंडळी विविध शाळांमधील बालकच आहेत.प्रताप महाविद्यालयातील भव्य प्रांगणात उभारण्यात आलेल्या ‘साने गुरुजी साहित्य नगरी’त हे बालसंमेलन झाले असून 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2, 3 आणि 4 फेब्रुवारी 2024 रोजी अमळनेर शहरात होत आहे. या निमित्ताने आज बालमेळावा आयोजित करण्यात आला होता. या बालमेळाव्याच्या अध्यक्षपदी तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय, चाळीसगावचा विद्यार्थी शुभम सतीश देशमुख याची निवड करण्यात आली असून बाल उद्घाटक म्हणून रावसाहेब रुपचंद माध्यमिक , उच्च माध्यमिक विद्यालय, जळगावची विद्यार्थिनी पियुषा गिरीष जाधव तर बाल स्वागताध्यक्षा म्हणून डी.आर.कन्या हायस्कूल, अमळनेरची विद्यार्थिनी दीक्षा राजरत्न सरदार हिची निवड झाली आहे. जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी या बाल साहित्य संमेलनात सहभाग घेतला. सध्या स्थितीत विज्ञान आणि तंत्रज्ञान हे दिवसेंदिवस वाढत असून अशा काळात विज्ञानिक तथा वैज्ञानिक साहित्य याकडे विद्यार्थ्यांनी प्रमुख लक्ष द्यायला हवे असे मत या बाल संमेलनाचे अध्यक्ष पद भूषवलेल्या शुभम देशमुख यांनी व्यक्त केले आहे. मोबाईलच्या युगात बालकांच्या मनावर बालपणापासूनच साहित्याचे संस्कार व्हायला हवे आणि अशा बाल साहित्य संमेलनामुळे विद्यार्थ्यांमध्ये तसेच मुलांमध्ये साहित्य , ग्रंथाची ओळख निर्माण होणार असल्याचा विश्वास बाल संमेलनाचे उद्घाटक पियुषा जाधव हिने व्यक्त केला आहे.