BSNL 4G साठी 930 गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी

मुंबई, दि. १३ :
नवीन तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण आणि दुर्गम भागांपर्यंत इंटरनेट सुविधा पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ला राज्यातील 930 गावांमध्ये मोबाईल टॉवर उभारण्यासाठी जमीन विनामूल्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. BSNL ने दुर्गम आणि आदिवासी भागांमध्ये 4G सेवा वाढवण्यासाठी ‘ग्राउंड-बेस्ड टॉवर्स’ आणि संबंधित उपकरणांसाठी जमीन मागितली होती. सरकारने प्रत्येक टॉवरसाठी 200 स्क्वेअर मीटर जमीन विनाशुल्क देण्यास मंजुरी दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना पुढील 15 दिवसांत प्रकल्पास मंजुरी देऊन वीजपुरवठा आणि फायबर केबल्ससाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ही योजना महाराष्ट्रातील डिजिटल समावेशनाला गती देणार असून दुर्गम भागांतील नागरिकांना आधुनिक संवादसुविधांचा लाभ मिळणार आहे. एप्रिल 2023 मध्ये 2,751 गावांमध्ये टॉवर उभारण्याची योजना होती, मात्र तांत्रिक अडचणींमुळे अनेक ठिकाणी काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे BSNL ने सुधारित यादीतून 930 गावांची निवड केली, ज्याला आता मंजुरी मिळाली आहे.
या योजनेअंतर्गत 30 जिल्ह्यांमध्ये टॉवर उभारले जाणार आहेत. यामध्ये परभणी (73), नांदेड (70), लातूर (67), यवतमाळ (63), अमरावती (61), नाशिक (60), रायगड (65) हे प्रमुख जिल्हे आहेत. तसेच गडचिरोली (48) आणि पालघर (14) या आदिवासी भागांचाही समावेश आहे.