सहकारी उपनिबंधक कार्यालयातील सर्व कामकाज आता ऑनलाइन

मुंबई दि २५ — सहकारी उपनिबंधक कार्यालयातील सर्व कामकाज डिजिटल करण्यात येणार असून येत्या तीन महिन्यात त्यातील काही बाबी पूर्ण करण्यात येतील तर उर्वरित बाबी सहा महिन्यांत सुरू करण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासांत केली.
याबाबतचा प्रश्न वरुण सरदेसाई यांनी उपस्थित केला होता. या कार्यालयातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. Meta सोबत लवकरच करार करून या सेवा व्हॉटस् ॲप माध्यमातून ही दिल्या जातील. सर्वसामान्य नागरिकांना या सेवा घेणं सोपे जावे यासाठी ही व्यवस्था करण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.
हुक्का पार्लरवरही शिकंजा
राज्यातील हुक्का पार्लरचं वाढते प्रस्थ रोखण्यासाठी यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्यात येऊन तो अधिक कडक करण्यात येईल आणि असे पार्लर पोलिसांनी शोधून न काढता इतरांनी पकडून दिले तर संबंधित पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासांत दिली. याबाबतचा प्रश्न सुनील कांबळे यांनी उपस्थित केला होता. त्यावर सुधीर मुनगंटीवार, संजय केळकर, आशिष देशमुख, सिद्धार्थ शिरोळे यांनी उप प्रश्न विचारले.
हुक्का पार्लर शोधून काढून त्यावर कारवाईसाठी मोहीम राबविली जाईल, दुसऱ्यांना हुक्का पार्लर सापडलं तर संबंधित परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल, तिसऱ्यांदा सापडला तर कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल आणि त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल असं ही मुख्यमंत्री म्हणाले.
ML/ML/SL
25 March 2025