केरळमध्ये या व्हायरसमुळे चार जिल्ह्यांत अलर्ट जारी

 केरळमध्ये या व्हायरसमुळे चार जिल्ह्यांत अलर्ट जारी

छायाचित्र प्रातिनिधीक

कोझीकोड, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केरळ राज्यात निपाह व्हायरसचा प्रसार वाढला असून कोझिकोडमध्ये निपाह व्हायरसमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर कन्नूर, वायनाड आणि मलप्पुरम जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. निपाह व्हायरसच्या प्रादुर्भावाबाबत संशोधन करण्यासाठी आज पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) ची टीम आज केरळमध्ये दाखल झाली आहे. कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये एक लॅब बांधली जाईल, ज्यामध्ये NIV टीम निपाह चाचणी आणि वटवाघळांचे सर्वेक्षण करेल.

काल रात्री केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी तातडीची बैठक बोलावली होती. यामध्ये सर्व आमदार, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी निपाह विषाणूचा सामना करण्यासाठी आवश्यक प्रयत्नांबाबत चर्चा करण्यात आली. केरळमध्ये आतापर्यंत निपाह व्हायरसची चार प्रकरणे समोर आली असून, त्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. निपाहमुळे पहिला मृत्यू 30 ऑगस्टला झाला आणि दुसरा मृत्यू 11 सप्टेंबरला झाला.

वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, दोन्ही मृतांचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) मध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आरोग्य विभागाने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल अँड रिसर्च (ICMR) सोबतही चर्चा केली आहे आणि राज्यातील खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या उपचारासाठी मोनोक्लोनल अँटीबॉडीज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

कोझिकोडमध्ये सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर 7 ग्रामपंचायतींना कंटेनमेंट झोन करण्यात आले आहेत. कंटेनमेंट झोनमधील सर्व शैक्षणिक संस्था, अंगणवाडी केंद्र, बँका आणि सरकारी संस्था बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लोकांना मास्क घालणे बंधनकारक आहे. फक्त औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत उघडण्यास परवानगी आहे.

2018 मध्ये केरळमधील कोझिकोड आणि मलप्पुरम जिल्ह्यात निपाह व्हायरसमुळे 17 लोकांचा मृत्यू झाला होता. याआधी कोचीमध्ये 2019 मध्ये निपाह व्हायरसचा एक केस समोर आला होता. त्याच वेळी, 2021 मध्ये कोझिकोडमध्येही निपाह व्हायरसचा एक केस आढळला होता.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, निपाह हा नवीन व्हायरस आहे. हा व्हायरस प्राण्यांद्वारे मनुष्यांमध्ये पसरतो. तसंच दूषित जेवणाच्या माध्यमातून हा व्हायरस एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये त्याचा संसर्ग होतो. हा व्हायरस सर्वात आधी 1998 मध्ये मलेशियाच्या कम्पंग सुंगाई निपाहमध्ये आढळला होता.

लक्षणे
एखाद्या व्यक्तीला निपाह व्हायरसची लागण झाली असेल तर त्याला ताप, डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास, घशात खवखव, न्युमोनिया यांसारखी लक्षणे दिसातात. एखाद्याची प्रकृती गंभीर असेल तर त्याला एन्सेफलायटीस (मेंदूला सूज येणे) होऊ शकतो

SL/KA/SL

13 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *