अक्षय तृतीया : सर्वांच्या आयुष्यातील सुख समृद्धी आणि शुभंकराचा क्षय न होवो!

राधिका अघोर
अक्षय तृतीया हा हिंदू धर्मपरंपरेतला एक महत्वाचा सण आहे. वर्षातील साडे तीन मुहूर्तांपैकी एक महत्वाचा मूहूर्त मानला जातो, त्यामुळे या दिवशी शुभ दिन म्हणून लग्न कार्ये आणि इतर शुभ गोष्टी केल्या जातात. वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते.
अक्षय तृतीयेच्या नावातच, त्याच्या मागचा अर्थ लपलेला आहे. ज्याचा क्षय होत नाही, ते अक्षय. भारतीय तत्वज्ञानाचा मुख्य विचार शाश्वतता आहे. ऊर्जा कधीही नष्ट होत नाही, तिचे केवळ स्वरूप बदलत असते, मात्र ऊर्जा, चैतन्य कायम असते. आत्मतत्व कायम असते, हा हिंदू तत्वज्ञानाचा गाभा आहे. आणि अक्षय तृतीया हा सण हेच शाश्वत, अक्षय चैतन्य साजरे करणारा आहे.
याच दिवशी दशावतारातील एक अवतार मानल्या जाणाऱ्या परशुरामांची जयंती असते. देवी अन्नपूर्णा जयंती असते, बसवेश्वर जयंतीही अक्षय तृतीयेलाच असते. याच दिवशी भगिरथाने गंगा पृथ्वीवर आणली असे मानले जाते, आणि याच दिवशी महाभारताच्या लेखनाला व्यासांनी सुरुवात केली, असेही म्हणतात. याचा अर्थ, प्राचीन काळापासून अक्षय तृतीया हा महत्त्वाचा दिवस मानला जातो.
अक्षय तृतीयेला केलेले पुण्यकर्म कायमस्वरूपी आपल्या सोबत राहते, असेही मानले जाते. या दिवशी अनेक नव्या कामांचा शुभारंभ केला जातो. सोने किंवा इतर धातू खरेदीही केली जाते.
थोडक्यात, आपल्या कार्याचे लाभ अक्षय असावेत, ह्या श्रद्धेने ह्या दिवशी नवी कामे हातात घेतली जातात. अक्षय तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख व समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेविषयी कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, अशी श्रद्धा आहे.
अक्षय तृतीयेला पितरांना तर्पण देण्याचीही पद्धत आहे. यामागेही तेच तत्वज्ञान आहे. आत्मास्वरूपात आपले पितर कुठेतरी आहेत, अशी हिंदू धर्मियांची श्रद्धा असते. त्या सर्वांचे या दिवशी श्राद्ध केले जाते. त्यासाठी तांदळाची खीर म्हणजे अक्षत असलेल्या तांदळाचा पदार्थ हा मुख्य नैवेद्य असतो, त्याशिवाय आमरस, आंबोणी, चिंचोणी, कुरडया, पापड, पन्हे असे पदार्थ केले जातात, त्यामागे रब्बी हंगामातील नव्या पिकांचा नैवेद्य दाखवणे हा हेतू असतो. त्याशिवाय अनेक लोक अक्षय तृतीयेला नवा माठ आणतात. यादिवशी पितरांचे ऋण फेडण्यासाठी ब्राह्मणांना भोजन दिले जाते, माठात वाळा घालून दिला जातो. नवे शुभ्र वस्त्र दिले जाते.
महाराष्ट्रात अक्षय तृतीयेला सांस्कृतिक महत्त्व देखील आहे. या आधीच्या महिन्यात स्त्रियांनी सुरु केलेल्या चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाची सांगता अक्षय तृतीयेला होते. हळदीकुंकवाला कैरीची डाळ, भिजवलेले हरभरे आणि पन्हे असा मेनू असतो.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अक्षय तृतीयेला ‘आखाजी’ किंवा ‘आखा तीज’ असेही म्हटले जाते. विशेषतः खानदेशात या सणाला दिवाळी इतकेच महत्त्व आहे. या दिवशी शेतीकामांची सुरुवात केली जाते. आखाजीचा विशेष नैवेद्य दाखवला जातो. तसेच कृषी देवता बलरामाचीही पूजा केली जाते.
केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर, देशात अनेक ठिकाणी अक्षय तृतीया साजरी केली जाते. उत्तर भारतात या दिवशी पूजा आणि प्रार्थना केल्या जातात. गंगा नदीमध्ये स्नान करणे,तीर्थयात्रा करणे,यज्ञ करणे तसेच अन्न आणि धनदान केले जाते.
ओरिसात तर याच दिवशी प्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेचा प्रारंभ होतो. तसेच श्रीकृष्णासह लक्ष्मी देवतेची पूजा करून नवीन धान्याची पेरणी केली जाते.
दक्षिण भारतात महाविष्णू आणि लक्ष्मी , कुबेर पूजनाचे महत्त्व आहे. तर पश्चिम बंगालच्या व्यापारी वर्गात अक्षय्यतृतीया महत्त्वाचा दिवस मानला जातो. व्यापारी लोक नव्या हिशोबाच्या वह्या या दिवशी वापरात आणतात. राजस्थानात या दिवसाला आखा तीज असे म्हणतात. राजस्थानातील या दिवशी विवाह करण्याची पद्धत आहे, लक्ष्मीची पूजाही याच दिवशी केली जाते.
केवळ हिंदूच नव्हे तर जैन आणि बौद्ध धर्मातही अक्षय तृतीयेला महत्त्व आहे. जैन तीर्थंकर भगवान वृषभदेव यांनी मोक्ष प्राप्त करण्यासाठी जवळपास वर्षभर कठोर व्रत आणि उपवास केला. हस्तिनापूर इथे,राजाच्या हस्ते ऊसाचा रस पिऊन त्यांनी आपल्या व्रताची सांगता केली, तो दिवस अक्षय्य तृतीयेचा होता, असे मानले जाते. बौद्ध धर्मामध्येही आखाजी या दिवसाचे विशेष महत्व मानले जाते.