अक्षय कुमारचे ‘चलो महाकाल’ गाणे ठरले वादग्रस्त

उज्जैन, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाशिवरात्रीच्या काही दिवस आधी अभिनेता अक्षय कुमारने आपल्या चित्रपटातील ‘चलो महाकाल…’ हे गीत समाजमाध्यमावर प्रदर्शित केले. या गीतावर महाकाल मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी आक्षेप नोंदवला आहे. या अशा प्रकारच्या दृश्यांमुळे सनातन धर्माची प्रतिमा मलीन होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाकाल मंदिराच्या पुजाऱ्यांच्या या आक्षेपांमुळे अक्षयचे हे गाणे चांगलेच अडचणीत सापडले आहे.
अक्षय कुमार यांचे ‘चलो महाकाल…’ हे गीत प्रदर्शित करण्यात आल्यानंतर त्या गीताच्या चित्रीकरणावर उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या पुजारी महासंघाचे अध्यक्ष महेश पुजारी यांनी म्हटले आहे की,
महाकालाचा महिमा सर्व जगात आहे. अक्षय कुमार यांनी त्या पिंडीला स्वतः मिठी दृश्य चित्रीत केले आहे. त्याच्यावर पंचामृताचा अभिषेक झाल्याचे दाखवणेही चुकीचे आहे. या गीतात पिंडीवर भस्म चढवताना दाखवले आहे. भस्म आरती केवळ महाकालच्या मंदिरातच होते. इतर कोणत्याही मंदिरातील पिंडीवर भस्म चाळले जात नाही. चित्रीकरणासाठी स्टुडिओत एखादी पिंडी तयार करुन त्यावर हा विधी करणे चुकीचे आहे. त्यामुळे सनातन धर्माच्या परंपरांचा भंग होतो. असे प्रकार रोखले पाहिजेत. ही दृश्ये काढून टाकली पाहिजेत. या आधीही हिंदू धर्मातील परंपरांचे चुकीचे चित्रण सिनेमांमध्ये दाखवले गेले आहे. त्यावर न्यायालयात खटलेही सुरु आहेत. हिंदू धर्माच्या परंपरांचा अपमान करणारी ही दृश्ये चुकीची आहेत.
SL/ML/SL
19 Feb. 2025