आदिवासी महिलांचे बांबूचे आकाशकंदील पोहचले साता समुद्रापार
पालघर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवाळीचा सण म्हणजे दिव्यांचा उत्सव, प्रकाशाचा उत्सव. दिवाळीच्या सणाला आकाशकंदिलांना विशेष महत्व आहे. दिवाळीला घरात दिवे लावण्याबरोबरच आकाश कंदीलांनाही घराची शोभा वाढवण्यासाठी पसंती देतात. त्यामुळे दिवाळीच्या काळात घरासह अंगण आणि परिसर उजळून प्रकाशमय करणाऱ्या आकाश कंदिलांची मागणी वाढते. सध्याच्या काळात बाजारात प्लास्टिकचे विविध प्रकारचे रंगीबेरंगी आकाश कंदील विक्री साठी पहावयास मिळतात.
अशात पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्या मधल्या विक्रमगड बांबू उद्योग प्रोड्यूसर कोआपरेटिव लिमिटेट या कंपनीच्या आदिवासी महिलांनी बांबू पासून पर्यावरणपूरक असे आकाश कंदील तयार करण्यावर भर दिला आहे. आणि त्यांनी तयार केलेल्या या सुंदर अशा आकाश कंदीलांना भारतासह परदेशात ही पसंती मिळत आहे. या कंपनीच्या आदिवासी महिलांनी यंदा तयार 3000 पेक्षा जास्त बांबुंचे सुंदर आणि सुबक असे आकाश कंदील तयार केले आहेत. यावेळी त्यांनी सप्तश्रृंगी, कळसूबाई , संह्याद्री , अंजनेरी असे जवळपास चार प्रकारचे आकाशकंदील तयार केले आहेत.
विशेष म्हणजे आदिवासी समुदायाची निसर्गाशी जवळीक असते आणि त्यामुळे यंदा या महिलांनी नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या, विशेष महत्व असलेल्या अशा गड, पर्वत, शिखर आदींची नावे या आकाश कंदिलांना दिली आहेत. जसे कि, अंजनेरी गड, सह्याद्री पर्वत, कळसूबाई- महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर, सप्तश्रृंगी देवीचा गड यासारख्या महत्वपूर्ण ठिकाणांची नावे या कंदिलांना देण्यात आली आहेत. तसेच या आकाशकंदिलांवर आदिवासी संस्कृतीचं प्रतिक म्हणून वारली पेंटिंग देखील साकारण्यात आली आहे.
आठ गावातल्या जवळपास 130 महिला आणि 20 पुरुष अशा 150 लोकांनी एकत्रित रित्या हे 3000 पेक्षा जास्त आकाश कंदील तयार केले आहेत. हे बांबूंचे आकाश कंदील मुंबईसह भारतातील इतर राज्यात, शहरात त्याचबरोबर परदेशातील अमेरिका, कैलिफोर्निया यासारख्या ठिकाणी केशव सृष्टी संस्थेच्या माध्यमातून ऑर्डर नुसार विक्रीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे आता पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी महिलांनी बांबूपासून तयार केलेल्या आकाश कंदिलांना केवळ भारतातचं नव्हे तर परदेशातही पंसती मिळत आहे.
विक्रमगड मधल्या टेटवाली गावात ही हे आकाश कंदील विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. यंदा तयार केलेल्या आकाशकंदिलांपासून विक्रमगड बांबू उद्योग प्रोड्यूसर कोआपरेटिव लिमिटेट या कंपनीच्या महिलांनी जवळपास 18 लाखांचं उत्पन्न मिळवलं आहे. त्यापैकी 11 लाखांचा निधी कामानुसार महिलांना देण्यात येणार आहे. त्यामुळे येणारा दिवाळी हा सण आनंदात जाणार असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी महिलांनी व्यक्त केल्या.
बांबू पासून विविध वस्तू तयार करण्याच्या या कलेमुळे आज पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या महिलांनी आता आपली कंपनी स्थापन केली आहे. बचत गटाच्या माध्यमातून सुरु झालेला हा प्रवास आता एका कंपनीत रुपांतरीत झाला आहे. त्यामुळे आता या आदिवासी महिलांनी भारतासह साता समुद्रापार परदेशात ही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
ML/ML/PGB
27 Oct 2024