अजमेर दर्ग्यात शिवमंदिर असल्याचा दावा; याचिकेवर 20 डिसेंबरला सुनावणी

राजस्थानमधील अजमेर येथील प्रसिद्ध दर्गा हिंदू मंदिर म्हणून घोषित करणारी याचिका कोर्टाने स्वीकारली आहे. न्यायालयाने सर्व पक्षकारांना नोटीस बजावली असून पुढील सुनावणीची तारीख 20 डिसेंबर आहे. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी अजमेर दिवाणी न्यायालयात (पश्चिम) याचिका दाखल करून दर्ग्यात श्री संकटमोचन महादेव मंदिर असल्याचा दावा केला आहे.निवृत्त न्यायाधीश हरविलास शारदा यांनी १९११ मध्ये लिहिलेले ‘हिस्टॉरिकल अँड डिस्क्रिप्टिव्ह’ हे पुस्तक गुप्ता यांनी पुरावा म्हणून न्यायालयाला सादर केले. तसेच दर्ग्याची रचना आणि शिवमंदिराचे पुरावेही दिले आहेत. यानंतर न्यायाधीश मनमोहन चंदेल यांनी दावा सुनावणीस योग्य मानला असून दर्ग्याच्या अंतर्गत व्यवस्था पाहणाऱ्या केंद्र सरकारच्या समितीला अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणला या खटल्यातील पक्षकार म्हणून नोटीस बजावली आहे. त्यानुसार या प्रकरणाची पुढील सुनावणी २० डिसेंबर रोजी होणार आहे. त्यात तिघांनाही आपली बाजू मांडावी लागणार आहे.