पुरस्कार प्राप्त शिक्षक हे राज्याचे ब्रँड ॲम्बेसेडर

मुंबई दि. २२ :- विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश देण्याचे काम शिक्षक करतात. त्यामुळे शिक्षकांचा सन्मान हा राष्ट्रनिर्मितीचा सन्मान आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते न शिकवता, कौशल्याधारित शिक्षण, समस्यांचे निराकरण, टीमवर्क आणि मूल्याधारित शिक्षण, ज्ञानासोबत सद्गुणांची शिकवणूक देऊन स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण होईल अशी सशक्त पिढी घडवावी. पुरस्कार प्राप्त शिक्षक हे राज्याचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गौरव पुरस्कार वितरित करण्यात आले. एनसीपीएच्या टाटा थिएटर मध्ये झालेल्या या समारंभात राज्यातील 111 गुणवंत शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर, आमदार ज.मो.अभ्यंकर, ज्ञानेश्वर म्हात्रे, मनीषा कायंदे, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांच्यासह पुरस्कारप्राप्त शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.
‘शिक्षकांचे कार्य महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी’
शिक्षक केवळ पुस्तकातील धडा शिकवत नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देतात. आत्मविश्वास, संस्कार आणि प्रामाणिकपणाची बीजे त्यांच्या मनात पेरतात. शिक्षकांचे कार्य महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुरस्कार वितरणाच्यावेळी दिलेल्या व्हीडिओ संदेशात केले.ML/ML/MS