अजित पवार दादागिरी प्रकरणी कार्यकर्त्यांवर गुन्हे

सोलापूर दि ५– राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिस्तप्रिय नेते म्हणून ओळख असलेल्या अजित पवारांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्यास फोनवरुन दादागिरी केली.
पवारांच्या या संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, माध्यमांत हे वृत्त झळकल्यानंतर आता संबंधित गावातील शेतकरी आणि फोन लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे, अखेर अजित दादांना अडचणीत आणणाऱ्या कुर्डू येथील 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यामध्ये, बाबा जगताप, नितीन माळी, संतोष कापरे, अण्णा धाणे यांच्यासह 15 ते 20 ग्रामस्थांचा समावेश असून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी, ग्राम महसूल अधिकारी प्रीती शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.
गावातील मुरूम उपसा करताना अडवणूक केल्यानंतर येथील एका कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून कारवाई थांबविण्याची विनंती केली होती. त्यावेळी, अजित पवारांनीही फोनवरुन संबंधित महिला अधिकाऱ्यास कारवाई थांबवा, मी तुम्हाला आदेश देतो असे म्हणत दादागिरीची भाषा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे, अजित पवारांवर टीकेची झोड उठल्याने आता संबंधित ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. कुर्डूवाडी पोलीस ठाणे गु.र.नं 371/2025 बी.एन.एस.चे कलम 303(2),3(5) व पर्यावरण संरक्षण अधिनियम 9.15 प्रमाणे फिर्यादी-प्रीती प्रकाश शिंदे वय 27 वर्ष धंदा नोकरी (ग्राम महसूल अधिकारी कुर्डू) रा. मोडनिंब ता. माढा जिल्हा सोलापूर यांनी याबाबत तक्रारदाखल केली आहे.
कुर्डूतील दादाराव गोरख माने यांची शेती गट नंबर 575/1 मधील 0.20 आर जमिनीमधील अंदाजे 120 ब्रास मुरूम रक्कम अंदाजे 72,000 हजार रुपये, बाहेर काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी संगनमत करुन तहसीलदार माढा यांची कोणतीही परवानगी न घेता पर्यवरणाचा ऱ्हास करुन मौजे कुर्ड शेती गट नंबर 575/1 मधील शेतकरी श्री दादाराव गोरख माने यांच्या मालकीचे 0.20 आर. जमीनमधील अंदाजे 120 ब्रास मुरुम प्रति ब्रास 600/- रुपये प्रमाणे एकूण 72,000/- रुपयांचा मुरुम अवैद्यरित्या उत्खनन करन चोरी केल्याची तक्रार दाखल झाली आहे. याशिवाय जमाव जमवून सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.ML/ML/MS