लाडकी बहीण योजनेत सुधारणा करण्याचे अजित पवारांचे सुतोवाच…
मुंबई दि १७– विकसित भारत , विकसित महाराष्ट्र हाच अर्थसंकल्पाचा मूळ गाभा आहे असे स्पष्ट करीत शेती, उद्योग , पायाभूत सुविधा, रोजगार आणि सर्व घटकांसाठी विकास योजना या पाच गोष्टींवर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत स्पष्ट करत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सुधारणा करण्याचे सुतोवाच केले आहे.
राज्यकर्त्यांना दूरदृष्टी असायला हवी ती योजना आखताना दिसायला हवी, हा अर्थसंकल्प केवळ एक वर्षाचा विचार न करता पूर्ण पाच वर्षांचा विचार करण्यात येऊन सादर करण्यात आला आहे असे पवार म्हणाले. हा अर्थसंकल्प नियोजित उद्दिष्ट गाठल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कृषीचा विकास दर वाढला आहे, तो राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिल्यानेच असे ते म्हणाले. AI चा वापर कृषी क्षेत्रात करण्यात येत आहे. ही सरकारची जबाबदारी होती आणि ती आम्ही उचलली आहे,यातूनच कृषी क्षेत्राला उभारी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा देण्याचा संकल्प केला आहे.
शेती हा राज्याचा प्राधान्य क्रम आहे असे सांगत देशात सर्वात जास्त सोयाबीन खरेदी केली , धान , दूध , कापूस खरेदीसाठी जास्त पैसे दिले. शून्य टक्के व्याजाने शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी प्रयत्न आम्ही सुरू केले आहेत असे वित्तमंत्री म्हणाले .
उद्योग क्षेत्रात पुढील पाच वर्षांत चाळीस लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न आहे, त्यातूनच पन्नास लाख रोजगार उपलब्ध करण्याचे प्रयत्न
आहे. राज्यकर्त्यांनी मोठी स्वप्न बघायची असतात , त्यासाठी राजकीय इच्छा शक्ती लागते , ती आमच्यात आहे. जिल्हा हा केंद्रबिंदू मानून राज्याचा आर्थिक विकास करायचा आहे असे पवार म्हणाले.
लाडकी बहीण योजना ही गरीब महिलांसाठीच आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, त्यांनी याचा फायदा घेऊ नये अशी अपेक्षा आमची आहे, ज्या अशा बहिणींनी पैसे घेतले त्यांचे पैसे परत घेणार नाही मात्र त्यांना यातून वगळावे लागेल असे सांगत ही
योजना आम्ही दुरुस्त करीत आहोत, गरीब घटकांनाच लाभ मिळावा अशी भूमिका सरकारची आहे असे पवार म्हणाले.
मुंबई बँक आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने महिलांसाठी लाडकी बहीण योजनेतून कर्ज देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे, त्यातून या महिलांना व्यवसाय सुरू करता येईल त्यातून ती महिला सक्षम होईल अशी अपेक्षा आहे. राज्याला आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे, महसुली तूट एक टक्याच्या आत ठेवली आहे.
राजकोषीय तूट देखील तीन टक्याच्या आत आहे, देशात केवळ तीनच राज्य अशी आहेत असे पवार म्हणाले.
नवीन योजनांसाठी पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद करता येईल, मात्र या अर्थसंकल्पात देखील जाहीर सर्व योजनांसाठी पुरेशी तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पातील महसुली तूट कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, करचुकवेगिरी रोखणे हा उपाय सुरू करण्यात आला आहे. खर्चावर नियंत्रण ठेवत आहोत. करचुकवेगिरीला
अटकेची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क आणि GST मधून तूट कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. विरोधकांनी अनावश्यक वक्तव्ये करून राज्याच्या येणाऱ्या गुंतवणुकीवर विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन करीत अजित पवार यांनी आपल्या भाषणात विरोधकांनी केलेल्या टीकेचा जोरदार समाचार घेत काही वेळा संत तुकारामांच्या ओळी तर काही वेळा शेरो शायरी करीत विरोधकांवर निशाणा देखील साधला.