उपमुख्यमंत्री अजितदादासह महायुतीच्या उमेदवार सौ. सुनेत्रा पवार यांनी काटेवाडीत बजावला मतदानाचा हक्क
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज राज्यातील 11 जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी 7 च्या ठोक्याला मतदानाला सुरुवात झाली. बारामती, कोल्हापूर, माढा, रत्नागिरी -सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, रायगड व हातकणंगले या सर्वच 11 मतदारसंघांतील मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या आणि मतदानाचा हक्क बजावला.
आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सौ. सुनेत्रावहिनी पवार यांनी आज काटेवाडीत मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही बळकट करण्यासाठी अधिकाधिक मतदारांनी मतदान करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खा. सुनिल तटकरे यांनी आपल्या कुटुंबासहीत दुरटोली मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते.
तेर येथे उस्मानाबाद(धाराशिव)लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सौ. अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांनी सहकुटुंब मतदान केले. यावेळी लोकशाही मजबूत करण्यासाठी अधिकाधिक मतदारांनी घराबाहेर पडून मतदान करावे असे आवाहन केले.
ML/ML/PGB 7 May 2024