*वारी म्हणजे काय? अजिंक्य राऊतने उलगडलं सार

 *वारी म्हणजे काय? अजिंक्य राऊतने उलगडलं सार

पुणे, दि ३
वारी म्हणजे केवळ चालणं नव्हे, तर चालता चालता स्वतःला शोधणं. श्रद्धेचा, सेवाभावाचा आणि सहअस्तित्वाचा जिवंत अनुभव म्हणजे वारी. यावर्षी अभिनेता अजिंक्य राऊत याने स्वतः पंढरपूरपर्यंतचा पाच दिवसांचा पायी प्रवास अनुभवला आणि हजारो भाविकांसोबत चालत वारीचा आत्मिक गोडवा प्रत्यक्ष अनुभवला. या प्रवासानंतर त्याने अतिशय साध्या शब्दांत वारीचं सार सांगितलं –
“लादलं तर ओझं, स्वीकारलं तर कर्तव्य!”
अजिंक्य राऊत झी टॉकीजवरील लोकप्रिय भक्तिपर कार्यक्रम ‘मन मंदिरा’ चा निवेदक आहे. रोज भक्तीचा अनुभव शब्दांमधून सादर करणारा अजिंक्य जेव्हा प्रत्यक्ष वारीच्या वाटेवर उतरतो, तेव्हा त्याचं मन अधिक खोलवर हलतं. तो सांगतो, “जसं आपण एखाद्या ट्रेकला किंवा मॅरेथॉनमध्ये सहभागी होतो – खडतर वाटा पार करत, अनोळखी लोकांबरोबर जुळवून घेत – तसं काहीसं, पण हजारपटीने खोल, वारीत अनुभवायला मिळतं. इथे ऊन, पाऊस, थकवा, भूक… सगळं विसरून माणसं चालतात. कोणत्याही मोबदल्याशिवाय – फक्त श्रद्धा आणि प्रेमामुळं.”
या प्रवासात अजिंक्यला अनेक भाविक भेटले. काही वृद्ध महिला गेली २५ वर्षं वारी करत होत्या. काही तरुण पहिल्यांदाच आले होते. पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर भक्तिभावाची तीच झळक होती. कोणी पाणी देत होतं, कोणी खाऊ वाटत होतं, आणि कोणीतरी फक्त सोबतीनं चालत होतं — ही वारी म्हणजे माणुसकीचा जिवंत अनुभव आहे.
वारी ही फक्त वैयक्तिक नाही, ती सामाजिक आणि कौटुंबिकही आहे. एक वारीकर अजिंक्यला म्हणाला,
“दरवर्षी आमचं संपूर्ण कुटुंब, नातेवाईक एकत्र येतो. ही चाल आम्हाला केवळ विठोबाजवळ नेते असं नाही, तर आम्हा सगळ्यांना एकमेकांजवळ आणते. या प्रवासातून आम्हाला पुढच्या वर्षासाठी ऊर्जा मिळते — म्हणून आम्ही दरवर्षी येतो.”
या शब्दांत वारीचं खरेपण आहे — ही एक श्रद्धेची यात्रा असली तरी, ती माणसांमधल्या नात्यांची आणि सामर्थ्याची देखील यात्रा आहे.
झी टॉकीजने यंदा ‘मन मंदिरा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून या वारीचा अनुभव संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचा सुंदर उपक्रम राबवला. वारीदरम्यान घेतलेली हृदयस्पर्शी दृश्यफुटेज, भाविकांचे अनुभव, आणि अजिंक्य राऊतची भावनिक भेट… हे सगळं ‘मन मंदिरा’च्या विशेष भागांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे — फक्त झी टॉकीजवर.
यावर्षी झी टॉकीजने आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम घेतला आहे – ‘विठू माऊलीचं वस्त्र बनवणारा कॅन्टर’ वारीमध्ये प्रत्यक्ष सहभागी आहे. पंढरपूरच्या दिशेने चालणाऱ्या या कॅन्टरला अनेक ठिकाणी भाविक भेट देत आहेत. या ठिकाणी श्रमदान करून विठोबाच्या वस्त्रनिर्मितीत स्वतःचा सहभाग नोंदवण्याची संधी मिळते — एक साक्षात भक्तीचा अनुभव.
शेवटी अजिंक्य म्हणतो,
“वारी ऐकून कळत नाही, ती चालल्यावरच उमगत जाते… आणि एकदा उमगली की ती आयुष्यभर आपल्याला साथ देते!” KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *