‘एअर रेस्क्यू’ करून वाचविले अंगणवाडी सेविकेचे प्राण…

गडचिरोली दि २०:– गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यातील तब्बल 112 गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. अशा बिकट परिस्थितीत गडचिरोली पोलिसांनी मानवतेचा हात पुढे करत अंगणवाडी सेविकेचे जीव वाचवले आहेत. भामरागडमधील आरेवाडा येथील गंभीर आजारी अंगणवाडी सेविकेला पोलिसांनी थेट हेलिकॉप्टरद्वारे गडचिरोलीत स्थलांतरित केले. या एअर रेस्क्यू ऑपरेशन राबवून जिल्हा सामान्य रुग्णालय दाखल करून महिलेचा जीव धोक्यातून बाहेर आणले आहे.
मुसळधार पावसाने गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पर्लकोटा नदीच्या पुरामुळे भामरागड तालुका अलग झाला असतानाच आरेवाडा गावातील अंगणवाडी सेविका सीमा बांबोळे यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने उपचाराची गरज होती. जिल्हा परिषदेच्या माहितीवरून पोलिसांनी वेळ न दवडता पवनहंस हेलिकॉप्टर रवाना केले आणि सीमा बांबोळे यांना सुरक्षित गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या धाडसी कारवाईत पोलिसांचे अधिकारी-कर्मचारी, महसूल विभाग तसेच पायलट डीआयजी. श्रीनिवास आणि सहपायलट आशिष पॉल यांचे सहकार्य मोलाचे ठरले. सध्या सीमा बांबोळे यांची प्रकृती स्थिर असून त्या धोक्याबाहेर आहेत.ML/ML/MS