एअर इंडियाने 12 मृतांच्या कुटुंबियांना दिले दुसऱ्यांचे मृतदेह

 एअर इंडियाने 12 मृतांच्या कुटुंबियांना दिले दुसऱ्यांचे मृतदेह

मुंबई, दि. २३ : गेल्या महिन्यात अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात 269 लोकांचा मृत्यू झाला होता. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे मृतदेह अद्याप त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचलेले नाहीत. अशातच आता एअर इंडियाने लंडनमधील पीडिताच्या कुटुंबियांना 12 चुकीचे मृतदेह पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे. लंडनमधील तपासणीतून ही माहिती समोर आली आहे.

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळ्याने ज्यामध्ये प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह 269 लोकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये 52 ब्रिटिश नागरिकांचाही समावेश होता. हा अपघात इतका भीषण होता की, बरेच मृतदेह जळलेल्या अवस्थेत होते, त्यामुळे त्यांनी ओळख पटवणे कठीण होते. त्यामुळे डीएनए चाचणीद्वारे मृतदेहांची ओळख पटवण्यात आली आणि त्यानंतर मृतदेह कुटुंबांकडे पाठवण्यात आले.

ब्रिटिश नागरिकांचे मृतदेह लंडनमध्ये पोहोचल्यानंतर मृतदेहांची पुन्हा तपासणी करण्यात आली. तपास अधिकाऱ्यांनी डीएनए जुळवला तेव्हा ते मृतदेह दुसऱ्याच व्यक्तीचे असल्याचे समोर आले. हे तब्बल 12 मृतदेहांसोबत घडले. मृतदेह बदलण्यात आल्याचे समोर आल्यानंतर अनेक कुटुंबांना अंत्यसंस्कार कार्यक्रम रद्द केल्याची माहितीही समोर आली आहे.

याबाबत बोलताना वकील जेम्स हीली प्रॅट यांनी सांगितले की, ’12 ब्रिटिश नागरिकांच्या मृतदेहांचे अवशेष परत पाठवण्यात आले आहेत. मी एका महिन्यापासून ब्रिटिश कुटुंबांच्या घरी आहे, या लोकांना त्यांच्या प्रियजनांचे मृतदेह परत हवे आहेत. मात्र अनेकांना त्यांच्या प्रियजनांचे अवशेष मिळालेले नाहीत, काहींना मृतदेह मिळाले आहेत मात्र ते दुसऱ्याचे आहेत. हा मोठा निष्काळजीपणा आहे, याबाबत कुटुंबांना स्पष्टीकरण मिळायला हवे.’

अहमदाबाद विमान अपघातानंतर ब्रिटनमधील कुटुंबांना दुसऱ्यांचेच मृतदेह पाठवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भातील यूकेच्या मीडियातील वृत्त समोर आल्यानंतर भारताने याबाबत खुलासा केला आहे. भारताने म्हटलं की, या घटनेबाबत ज्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान, अहमदाबाद विमान अपघातातील एकूण मृतांपैकी ५२ ब्रिटिश नागरिक होते. पण यातील दोन मृतांचे चुकीचे मृतदेह ब्रिटनमधील कुटुंबांना पोहोचल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं की, “भारतीय अधिकारी या मुद्द्यावर त्यांच्या ब्रिटनच्या समकक्षांसोबत काम करत आहेत. आम्ही हा अहवाल पाहिला आहे आणि याबाबतच्या मुद्यावर आम्ही ब्रिटनशी संपर्क साधत आहोत. या दुःखद अपघाताच्या पाश्र्वभूमीवर, संबंधित अधिकाऱ्यांनी प्रस्थापित प्रोटोकॉल आणि तांत्रिक आवश्यकतांनुसार मृतांची ओळख पटवली होती. सर्व मृतांच्या प्रतिष्ठेचा आदर करून हाताळण्यात आले. या समस्येशी संबंधित कोणत्याही चिंता दूर करण्यासाठी आम्ही यूके अधिकाऱ्यांसोबत काम करत आहोत.”

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *