जागतिक एड्स दिन निमित्ताने मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेद्वारे “स्वयम मेळा” संपन्न
मुंबई, दि २
जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने समाज माध्यम (सोशल मीडिया) इन्फ्ल्यूएन्सर या चांगल्या उपक्रमाचे उद्घाटन आज करण्यात आले. ज्या इन्फ्ल्यूएन्सरचे हजारो फॉलोअर्स आहेत, असे इन्फ्ल्यूएन्सर मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेचे (MDACS) चे उपक्रम वेगवेगळ्या स्तरावर पोहोचवतील. आरोग्याशी संबंधित जनजागृती करणारे उपक्रम प्राथमिक आरोग्य क्षेत्रामध्ये आणणे आवश्यक आहे. अशा पुढाकारामुळे महानगरपालिकेचे, शासनाचे उपक्रम आणि पुढाकार समाजातील गरजू आणि लाभार्थीं रूग्णांपर्यंत पोहचवण्याकरिता मदत होईल. अशा उपक्रमांमध्ये सर्व प्राथमिक आरोग्य व्यवस्था, मुख्य रुग्णालये याठिकाणी नागरी सहभाग आवश्यक आहे. सामूहिक जबाबदारीने एड्ससारख्या आजारावर नियंत्रण करतानाच संपूर्ण उच्चाटन करणे शक्य येईल, असे प्रतिपादन उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) तथा मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक श्री. शरद उघडे यांनी केले.
जागतिक एड्स दिन निमित्ताने एचआयव्हीसह जगणाऱ्या महिलांसाठी “स्वयम मेळा” चे आयोजन वडाळा येथील मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेच्या आवारात सोमवार, दिनांक १ डिसेंबर २०२५ करण्यात आले होते. ‘एआरटी’ केंद्रांमधील एचआयव्हीसह जगणाऱ्या महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून सक्षमीकरणाचा मार्ग निवडला आहे. मुंबईतील एआरटी केंद्रांमध्ये उपचार घेणाऱ्या १२० महिला स्पर्धा आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्या होत्या.
एड्स आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी दिले आहेत. जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने जनजागृतीपर तसेच स्वयंम् मेळा कार्यक्रमाचे आयोजन वडाळा स्थित मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेच्या आवारात करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) तथा मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक श्री. शरद उघडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) दक्षा शहा, मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. विजयकुमार करंजकर, राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयाचे पीएसएम विभागप्रमुख डॉ. विजय सिंग, नॅशनल कोएलिशन ऑफ पीएलएचआयव्ही इन इंडियाचे सचिव श्री. मनोज परदेशी, शीव (सायन) स्थित लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालयातील बालरोग विभागप्रमुख डॉ. (श्रीमती) राधा गिडियाल आदी मान्यवर उपस्थित होते.
उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) तथा मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक श्री. शरद उघडे यांनी एचआयव्ही/एड्स जागृती मशाल महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हस्तांतरित केली. ही मशाल मुंबईतील विद्यालयात नेण्यात येणार आहे. याप्रसंगी समुपदेशन पुस्तिका, ग्रंथालयांसाठी पुस्तके आणि खेळणी, दिनदर्शिका, मून अँड सन कार्ड, पीईपी पोस्टर, एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींसाठी प्रशिक्षणासह व्यावसायिक आणि नोकरीच्या संधी, एचआयव्हीबाधित व्यक्तींसाठी ‘मनोमिलन’ वधूवर परिचय मेळावा आदी उपक्रमांचे लोकार्पण श्री. उघडे यांनी केले. अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. विजयकुमार करंजकर यांनी मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेने गत वर्षभरात एड्स जनजागृती, प्रशिक्षण, मेळावे, मॅरेथॉन इत्यादी उपक्रम कार्यक्रम यांचा आढावा सादरीकरणाद्वारे मांडला.
स्वयंमेळाच्या निमित्ताने रांगोळी, पाककला , कलाकौशल्य, सलाड डेकोरेशन, नृत्य आदी स्पर्धांमध्ये महिला बचत गट सहभागी झाले. याप्रसंगी केईएम, नायर, राजावाडी, जे जे रुग्णालय, लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय येथील महिला बचत गट, एचआयव्ही-क्षयरोग टीबी जनजागृती, सामाजिक सुरक्षा योजना शिबीर- प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि आभा कार्ड, आरोग्य तपासणी यांच्या दालनांना मान्यवरांनी भेटी दिल्या. तसेच महिलांशी संवाद साधतानाच त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून तयार केलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतला.
यावेळी संबोधित करताना श्री. शरद उघडे यांनी सांगितले की, ‘अतिशय चांगल्या पद्धतीने मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेचे कार्य सुरु आहे. संस्थेमार्फत अनेक वर्षे येथे चांगल्या पद्धतीने काम होत आहे. अशा चमुचे नेतृत्व करताना अभिमान वाटतो. मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्था एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने उपक्रम राबवू शकते आणि देश पातळीवर नावलौकिक कमवू शकते, याचे हे एक उदाहरण आहे.
तसेच एचआयव्ही एड्स जागरूकता मशाल, व्हॉट्स अॅप बूस्ट मेसेज कॅम्पेन, वैद्यकीय महाविद्यालयात मैत्रीपूर्ण विभाग (Child Friendly Corner), एचआयव्ही प्रभावित मुलांसाठी ज्ञान, शिक्षण आणि मानसिक विकासासाठी उपयोगी वाचन साहित्य, एआरटी नियमित घेण्यासाठी आकर्षक आणि स्मरण देणारी तरुणांसाठीची प्रभावी पद्धत, ऑनलाईन समुपदेशन, पाठपुरावा, केस मॅनेजमेंट, डिजिटल मोड आदी उपक्रम सुरु करण्यात आले आहेत.
तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) समूहाच्या सक्षमीकरणासाठी स्वयं सहायता गटाची स्थापना, मानसिक आरोग्य तपासणी, जोखीम असणारे एचआयव्ही निगेटिव्ह व्यक्तींचा पाठपुरावा करण्यात येत आहे. प्रतिबंधात्मक ट्रॅकिंग कार्ड, समुपदेशकांची साधी, प्रभावी आणि दृश्यआधारीत शिक्षण सामुग्रीची निर्मिती केली जात असल्याचे श्री. उघडे यांनी सांगितले.
मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेचे (MDACS) आणि सार्वजनिक आरोग्य विभाग एकत्रितपणे काम करत असताना उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाऊ शकते. आपण सर्वांनी एकत्र येऊन हीच ऊर्जा पुढे देखील टिकवायची आहे. आपण एकत्रितरित्या समस्यांना सामोरे जाऊ शकतो आणि विजय मिळवू शकतो, असेही त्यांनी नमूद केल.KK/ML/MS