तंत्रज्ञानाच्या नव्या युगात – ‘एआय’चा वाढता प्रभाव
मुंबई, दि. ११ : ‘एआय’ म्हणजे केवळ संगणकाचा वापर नव्हे, तर मानवी मेंदूच्या विचारसरणीचे तंत्रज्ञानरूप आहे. ‘एआय’ चा वापर कौशल्यपूर्ण केला तर अधिक सुलभपणे काम करता येऊ शकते, असे मत कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशोर जस्मानी यांनी व्यक्त केले.
मंत्रालय येथे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयात वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल प्रसार माध्यमांसाठी चार दिवसीय कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यशाळेत ‘डिजिटल कन्टेंट क्रिएशन इन द एज जनरेटिव्ह एआय’ या विषयावर कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशोर जस्मानी बोलत होते.
यावेळी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, सरचिटणीस दिपक भातुसे यासह पत्रकार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशोर जस्मानी म्हणाले की, १९५६ मध्ये ‘कृत्रिम बुद्धिमत्ता या संकल्पनेचा जन्म झाला आणि तेव्हापासून मशीन शिकत होती, पण गेल्या दशकात ती समजायला आणि निर्णय घ्यायला शिकली आहे.
‘एआय’ला आपण दिलेल्या प्रचंड प्रमाणातील माहितीवरून ती शिकते. लाखो पुस्तके, कोट्यवधी लेख आणि डिजिटल डेटातून ती ज्ञान घेत असते. उदाहरणार्थ, काही एआय मॉडेल दररोज १ कोटींपेक्षा अधिक लेख वाचतात आणि त्यावरून उत्तरं तयार करतात. ‘एआय’ला जेवढी अचूक माहिती दिली जाईल, तेवढे अचूक परिणाम ती देते. म्हणजेच मानव जितका सजग, ‘एआय’ तितकी हुशार होतात.
एआयचा वापर – आपल्या रोजच्या जीवनात आज आपण वापरत असलेले बहुतेक डिजिटल प्लॅटफॉर्म्स एआयवर आधारित आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशोर जस्मानी म्हणाले की, तुमच्या खरेदीच्या सवयींवरून डिजिटल प्लॅटफॉर्म तुम्हाला त्या वस्तू सुचवतात. अॅलेक्सा व सिरी हे देखील त्याच प्रकारे काम करतात. हेल्थकेअर, बँकिंग व फायनान्स, शिक्षण, सादरीकरण, ड्रायव्हरलेस कार्स ही त्याची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. ए आय हा मानवाचा पर्याय नाही, तर सहकारी आहे. एआयच्या वाढत्या वापरामुळे अनेकांना नोकऱ्या जाण्याची भीती वाटते. ‘एआय’ हा मानवाचा प्रतिस्पर्धी नव्हे, तर त्याचा सहाय्यक आहे. जो एआयला योग्यरित्या समजून घेईल, वापर शिकेल, तो आपल्या कामात अधिक कार्यक्षम आणि यशस्वी ठरेल, असेही त्यांनी सांगितले.ML/ML/MS