अहमदनगर आजपासून होणार अहिल्यानगर – राज्य सरकारची अधिसूचना
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील विधानसभा निवडणूका अगदी तोंडावर आल्या असून आचारसंहिता लवकरच लागू होऊ शकते. त्यामुळेच राज्य सरकारकडून आता दररोज विविध निर्णयांवर अंतिम मोहोर उमटवली जात आहे. अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करण्यासाठी लागणाऱ्या सर्व कायदेशीर प्रक्रिया राज्य शासनाने पूर्ण केल्या आहेत. त्यानंतर आज (९ ऑक्टोंबर ) महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात त्यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. अहमदनगर शहरासह जिल्ह्याचे आणि तालुक्याचे नाव अहिल्यानगर करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात तसे नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धारशिव नामांतर महायुती सरकारने केले होते.
गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करण्याचा विषय प्रलंबित होता. त्यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीदिनास 300 वर्ष पूर्ण होत असतानाच या निर्णयाची अंमलबजावणी झाली. जामखेड तालुक्यातील चोंडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रम घेतला होता. तेव्हा अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव देण्याची घोषणा केली होती. या घोषणेवर आज अंतिम मोहोर उमटवून मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, धारशिवच्या नामांतरनंतर आणखी एका जिल्ह्याचे अन् शहराचे नाव बदलले आहे.
SL/ML/SL
9 Oct. 2024