अहमदाबाद विमान अपघात – पायलटच्या वडिलांकडून याचिका दाखल

 अहमदाबाद विमान अपघात – पायलटच्या वडिलांकडून याचिका दाखल

नवी दिल्ली, १६ : अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया फ्लाइट AI-171 च्या अपघातानंतर पायलट कॅप्टन सुमीत सभरवाल यांच्या वडिलांनी सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र न्यायिक चौकशीसाठी याचिका दाखल केली आहे. ८८ वर्षीय पुष्कराज सभरवाल यांनी ही याचिका दाखल करताना म्हटले आहे की, अपघाताच्या चौकशीसाठी सध्या कार्यरत असलेल्या एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) वर त्यांचा विश्वास राहिलेला नाही आणि त्यामुळे स्वतंत्र समितीची स्थापना सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

१२ जून २०२५ रोजी अहमदाबाद विमानतळावर एअर इंडिया फ्लाइट AI-171 चा अपघात झाला होता. या दुर्घटनेत पायलट सुमीत सभरवाल यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर प्रशासनाकडून प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली होती, मात्र सभरवाल कुटुंबीयांनी या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते, अपघातामागील तांत्रिक दोष, देखभाल व्यवस्थेतील त्रुटी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

पुष्कराज सभरवाल यांनी याचिकेत नमूद केले आहे की, अपघातानंतर मिळालेल्या प्राथमिक अहवालात अनेक महत्त्वाचे मुद्दे दुर्लक्षित करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांनी भारतीय पायलट्स फेडरेशनच्या सहकार्याने ही याचिका दाखल केली असून, न्यायालयाने नियुक्त केलेल्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समिती नेमावी, अशी मागणी केली आहे.

या याचिकेमुळे केवळ सभरवाल कुटुंबीयांनाच नव्हे, तर संपूर्ण विमान वाहतूक क्षेत्रातील सुरक्षाविषयक पारदर्शकतेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
SL/ML/SL 16 Oct. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *