अहमदाबाद विमान अपघात इंधन पुरवठा थांबल्याने झाल्याचा निष्कर्ष

नवी दिल्ली,दि. १२ : एअर इंडिया फ्लाइट AI171 च्या अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं. १२ जून २०२५ रोजी अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे निघालेल्या या बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमानाने टेकऑफ केल्यानंतर अवघ्या काही सेकंदात भीषण दुर्घटना घडली, ज्यामध्ये २६० लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने १२ जुलै रोजी सादर केलेल्या प्राथमिक अहवालात इंधन स्विच अनपेक्षितपणे बंद होणे व वैमानिकांमध्ये निर्माण झालेली गोंधळ ही या दुर्घटनेची मुख्य कारणं असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या अहवालानुसार, विमानाने १३:३८ IST वाजता टेकऑफ केल्यानंतर फक्त तीन सेकंदात दोन्ही इंजिन्सच्या इंधन स्विचेस ‘RUN’ वरून ‘CUTOFF’ मध्ये गेले आणि इंजिन्सला इंधनपुरवठा थांबला. यामुळे इंजिन्सचे कार्य क्षमतेने घटू लागले. या घटनेत कॉकपिटमधील संभाषणात एक वैमानिक दुसऱ्याला विचारतो, “तू फ्यूल बंद का केलं?” त्यावर उत्तर येते, “मी नाही केलं.” काही क्षणांनी MAYDAY कॉल देण्यात आला, पण विमान कोसळेपर्यंत ATC ला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.
अपघाताचा परिणाम अत्यंत भीषण होता — विमान BJ मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर आदळलं आणि २३० प्रवासी, १५ क्रू सदस्य व एका लहान बालकाचा जीव गेला. फक्त एक प्रवासी या अपघातातून जिवंत वाचला. यामध्ये कॅप्टनला १५,६०० तासांचा तर फर्स्ट ऑफिसरला ३,४०० तासांचा अनुभव होता.
AAIB च्या तपासामध्ये हे स्पष्ट झालं की इंधनाची गुणवत्ता समाधानकारक होती, आणि कोणत्याही प्रकारचा बर्ड स्ट्राइक, तांत्रिक बिघाड किंवा धोकादायक मालमत्ता या अपघातासाठी जबाबदार नव्हते. क्रॅश साइटवरील ढिगारा सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आला असून, दोन्ही इंजिन्स आता विश्लेषणासाठी क्वारंटाइन करण्यात आले आहेत. ब्लॅकबॉक्समधून मिळालेला डेटा आणि पोस्टमॉर्टेम अहवालांची सविस्तर तपासणी सुरु आहे.
Air India ने या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत तपासात पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आहे. Boeing कंपनीनेही ICAO च्या Annex 13 नुसार तपासाचा सन्मान राखत AAIB ला पूर्ण पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. हे बोईंग ७८७ प्रकारचे पहिले जीवघेणे अपघात असल्याने जगभरातील विमानवाहतूक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सध्या कोणत्याही विमान कंपनीसाठी विशेष सुरक्षा सूचना जारी करण्यात आलेल्या नाहीत, आणि तपास अद्याप सुरू आहे.
SL/ML/SL