अहमदनगर आता अहिल्यानगर
अहमदनगर , दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून ते अहिल्यादेवी नगर करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, लवकरच त्याबाबतचा अधिकृत निर्णय घेतला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते आज चौंडी इथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.अहिल्यादेवी होळकर यांचे कर्तृत्व हिमालायएवढे होते, त्यांचे नाव अहमदनगर जिल्ह्याला दिल्याने जिल्ह्याचा मानही तेवढाच मोठा होणार आहे .अहिल्यादेवी यांनी जन्म घेतलेल्या मातीचे आपल्यावर मोठे ऋण आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.अहिल्यादेवी होळकर यांनी समाजातल्या सर्व स्तरातील जनतेच्या कल्याणासाठी काम केले. हे सरकारही सर्वसामान्यांचे असून सर्वसामान्यांना न्याय देणारे आहे. नमो शेतकरी सन्मान योजना सुरू करण्यात आली असून याद्वारे केंद्राचे सहा हजार व राज्याचे सहा हजार असे एकूण 12 हजार रुपये शेतकऱ्यांना देणार आहोत असेही ते म्हणाले.पुण्यश्लोक अहिल्यादेवीचे नाव आपण अग्रक्रमाने घेतो. त्यांनी राज्य कारभाराचा आदर्श आपल्यासमोर उभा केला.अहिल्यादेवी होळकर यांच्या राजकारभरातील अनेक गोष्टींचा दाखला आजही दिला जातो.प्रशासकीय कारभाराचा उत्तम धडा त्यांनी दिला.भारताला प्रशासकीय संरचनेची मोठी देणगी दिली आहे, ती सर्वोत्तम आणि अनुकरणीय आहे असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ML/KA/PGB 31 May 2023