राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये ‘अग्नीवीर’ भरती प्रक्रिया सुरू

मुंबईसह आठ जिल्ह्यांमधील सन २०२५साठीच्या पहिल्या तुकडीतील ‘अग्रीवीर’ भरतीला सुरुवात झाली आहे. १० एप्रिलपर्यंत उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. ‘अग्नीवीर’ ही १६व्या वर्षी (Army Agniveer Bharti 2025 age limit) संरक्षण दलांद्वारे देशसेवा करण्याची संधी देणारी योजना आहे. चार वर्षांची सेवा बजाविल्यानंतर नोकरी सोडायची असल्यास संबंधित ‘अग्नीवीर’ सैनिकाला जवळपास १०.४० लाख रुपये मिळतात. त्याखेरीज दरमहा २१ हजार ते २८ हजार रुपये वेतनही मिळते. या माध्यमातून भूदलात सेवा देण्यासाठीची यावर्षीची भरती प्रक्रिया आता सुरू झाली आहे.
मुंबईच्या भूदल भरती अधिकारी (एआरओ) कार्यालयाने जाहिरात काढली आहे. त्यानुसार, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांमधील उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया आहे. जून महिन्यात चाचणी घेतली जाईल. ही चाचणीही ऑनलाइन होणार असल्याने उमेदवारांनी त्यासाठी केंद्रावर येताना पुरेसा चार्ज असलेला व किमान दोन जीबी इंटरनेट डेटा असलेला स्मार्ट मोबाइल फोन सोबत आणणे आवश्यक आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर मिळेल