तब्बल ४८ वर्षांनी लागला दुर्गाडी किल्ल्याचा निकाल , काय म्हणाले कोर्ट…

कल्याण, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि परिसराला शिव छत्रपतींच्या काळात मोठे महत्त्व होतो. त्याकाळात कल्याण हे एक महत्त्वाचे बंदर मानले जात असे. त्यामुळेच या परिसरात अनेक ऐतिहासिक खुणा आजही पहायला मिळतात. कल्याण शहरात वसलेला दुर्गाडी हा किल्ला आजही दिमाखाने उभा आहे. मात्र या किल्ल्यावरूनच हिंदू आणि मुस्लीमांमध्ये तब्बल ४८ वर्ष न्यायालयीन लढाई सुरु होती. अखेर आज न्यायालयाने यावर ऐतिहासिक निकाल दिला आहे. शहरातील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला येथे मस्जिद नसून मंदिरच आहे, असा निर्णय कल्याण जिल्हा न्यायालयाने आज दिला. या निर्णयानंतर अनेक हिंदु संघटनांनी दुर्गाडी किल्ला येथे येऊन देवीची आरती आणि जल्लोष साजरा केला.
दोन समाजाशी हा प्रश्न निगडित असल्याने अनुचित प्रकार टाळण्यासाठी मंगळवारी कल्याण शहरात पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी पोलीस बंदोबस्त वाढविला होता. सण, उत्सव काळात किल्ल्यावर कडेकोट पोलीस बंदोबस्त नेहमीच तैनात ठेवला जातो. यावेळी प्रथमच अचानक दुर्गाडी किल्ल्याजवळ पायथ्याशी पोलिसांच बंदोबस्त वाढविण्यात आल्याने नागरिकांनी सुरुवातीला आश्चर्य व्यक्त केले. दुर्गाडी किल्ला येथे मस्जिद नव्हे तर मंदिरच असल्याचा निकाल न्यायालयाने दिल्याचे जाहीर होताच, शिवसेना, भाजपचे कार्यकर्ते, अनेक हिंदु संघटनानी दुर्गाडी किल्ला येथे धाव घेऊन आनंदोत्सव साजरा केला.
सातवाहन काळापासून कल्याण हे महत्वाचे बंदर ओळखले जात होते. १६५७ पर्यंत कल्याण आदिलशहाकडे होते. शिवाजी महाराजांनी कल्याण शहराचे महत्व ओळखले. आदिलशहाचा पराभव करून कल्याण स्वराजात सामील केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून दुर्गाडी किल्ल्याला विशेष महत्व आहे. दुर्गाडी खाडी किनारचे ठिकाण पाहून शिवाजी महाराजांनी हिंंदवी स्वराज्याचे पहिले आरमार कल्याणमध्ये उभारले.
SL/ML/SL
10 Dec. 2024