उपनगर पालकमंत्री एँड आशिष शेलार यांनी मध्य रेल्वेच्या ट्रॅक मध्ये उतरून केली कामांची पाहणी

मुंबई, दि 31
पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होणार नाही यासाठी समन्वयाने काम करा, ब्लेम गेम करीत बसू नका, मान्सून पुर्व कामे तातडीने पूर्ण करा, असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री तथा राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री एँड आशिष शेलार यांनी आज दिले. तसेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भांडूप दरम्यान उपनगरीय रेल्वेतून प्रवास करुन प्रत्यक्ष ट्रॅक मध्ये उतरून कामांची पाहणी केली.
मंत्री आशिष शेलार यांनी आज पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात दोन्ही रेल्वे, महापालिका, मुंबई पोलीस, रेल्वे पोलीस, म्हाडा, एस आर ए आणि संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी दोन्ही रेल्वेच्या हद्दीत करण्यात आलेल्या नालेसफाईसह मान्सून पुर्व कामाचा आढावा घेतला.
या बैठकीस बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, मुंबई पोलीस आयुक्त, पश्चिम आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, मुंबई शहर व उपनगर जिल्हाधिकारी, लोहमार्ग पोलीस आयुक्त, म्हाडाचे मुख्याधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विविध संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भांडूप दरम्यान उपनगरीय लोकलने प्रवास केला. मस्जिद, सँडहस रोड ते भायखळा दरम्यान रेल्वे ट्रॅक मध्ये उतरून नालेसफाईची कामांची पाहणी केली तसेच सायन रेल्वे स्टेशनवर बसवण्यात आलेले पंप, कुर्ला, विक्रोळी तसेच भांडूप आणि कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन परिसरात करण्यात आलेली कामे व पंप याची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.
यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री एँड आशिष शेलार यांनी सांगितले की, मध्य रेल्वेवर ८१२ कल्व्हर्ट आहेत त्यापैकी ७५० कल्व्हर्टची साफसफाई झालेली आहे, उरलेल्या कल्व्हर्टची साफसफाई लवकरात लवकर करण्यात यावी. रेल्वे मार्गावरील हद्दीतील ६३७ धोकादायक झाडांपैकी ५५० झाडांच्या फांद्या तोडण्याची कारवाई झालेली आहे. बाकीच्या झाडांच्या फांद्या देखील लवकर तोडण्यात याव्यात. मध्य रेल्वेने गेल्यावेळी ९६ ठिकाणी पंप्स इन्स्टॉल केले होते ते यावेळी वाढवून १७७ पंप्प्स केले आहेत त्यांचे टेस्टींग वेळीच पूर्ण करावं असे निर्देश संबंधितअधिकाऱ्यांना दिले.
रेल्वे प्रशासनाने जवळ जवळ ३६ ठिकाणी पुराचे मोजमाप करणाऱ्या यंत्रणा बसवल्या आहेत. त्यापैकी ५ ऑटोमॅटिक डिजिटल आहेत आणि १२ मॅन्युअल आहेत. यांचं कोऑर्डिनेश बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाशी करणं आवश्यक आहे. कारण रेल्वे ट्रॅकवर पडणारा पाऊस आणि त्याचा निचरा याचे मोजमाप रेल्वे यंत्रणा करते पण पंप लावून ते पाणी बाहेर टाकणाऱ्या पर्जन्यजलवाहिन्या आणि नाल्यांची व्यवस्था महानगरपालिका करते. त्यामुळे या दोन्ही विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्वय साधण्याबाबत निर्देश दिले.
धोकादायक-24 इमारतींचा विषय मुख्यमंत्र्यांना कळवणार
महानगरपालिकेने रेल्वे हद्दीतील
मस्जिद, सँडहस रोड दरम्यानच्या
२४ धोकादायक इमारती घोषीत केल्या आहेत. माननीय मुख्यमंत्री आणि माननीय रेल्वेमंत्री यांना याविषयाबाबत अवगत करुन निर्णय करण्याबाबत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश देण्याबाबत विनंती करणार आहे.
मरिन लाईन्स आणि रेल्वेच्या बाहेरचे स्ट्रॉम वॉटर ड्रेन्स आणि कोस्टल रोडच्या कामामध्ये साफ करणारे ड्रेन्स यांबाबतच्या प्रशासकीय व्यवस्थांमध्ये समन्वय साधण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
पोलीसांनी डिझास्टर प्लॅन बनवावा
पावसामध्ये रेल्वे स्थानकात स्लो झालेली ट्रेन आणि त्यामुळे प्रवाशांची होणारी दाणादाण आणि वाढणारी गर्दी या स्थितीवर उपाययोजना म्हणून स्थानिक रेल्वे पोलीसांबरोबर मुंबई महानगरपालिकरेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने समन्वय साधावा. ३ मिनिटात येणाऱ्या रेल्वेला थोडा उशीर झाला तर प्रवाशांची संख्या वाढते अशा वेळेला कोणताही अन्य प्रसंग घडू नये म्हणून रेल्वे स्टेशनवर अशी परिस्थिती झाल्यास एक डिझास्टर प्लॅन बनवावा ज्यामध्ये बीएसटीच्या बसेसची वाहतूक सेवेची मदत घ्यावी. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या संबंधीत स्थानकांवर अशी उपाययोजना करावी.
दरम्यान, कोणत्याही प्रकारचे आरोप-प्रत्यारोप चालणार नाहीत असे मुंबई महानगरपालिका, रेल्वे प्रशासन वेस्टर्न आणि सेन्ट्रल, आपत्ती व्यवस्थापन, रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलीस यांना कडक निर्देश देण्यात आले आहेत.