ॲडव्होकेट असीम सरोदेंची सनद रद्द

 ॲडव्होकेट असीम सरोदेंची सनद रद्द

मुंबई, दि. 3 : राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे विधिज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. असीम सरोदे यांच्या वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलने आज हा निर्णय घेतला. या निर्णयाच्या विरोधात बार कौन्सिलमध्ये अपील करणार असल्याचे सरोदे यांनी स्पष्ट केले.

गेल्या २५ वर्षांपासून अन्यायग्रस्त लोकांना मी मदत करतो, लोकांसाठी विविध विषयात काम केले आहे. न्याय व्यवस्थेची प्रतिष्ठा वाढली पाहिजे, न्याय व्यवस्थेवर विश्वास वाढला पाहिजे म्हणून मी काम केले. पण राज्यपालांना मी फालतू म्हणालो म्हणून माझी सनद रद्द करण्याचा निर्णय घेतला पण त्यावेळी कोश्यारी हे राज्यपाल नव्हते, असे सरोदे यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच जर मी चुकलो असेल तर सामान्य नागरिकांची माफी मागेन, असेही ते म्हणाले.

असीम सरोदे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था, राज्यपाल व विधानसभा अध्यक्ष यांच्याविषयी काही आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यांच्या या विधानांमुळे न्याय व्यवस्थेचा अवमान झाला असून, न्यायालयांविषयी अविश्वास निर्माण झाला आहे, अशी तक्रार एका व्यक्तीने बार कौन्सिलकडे केली होती. या प्रकरणी असीम सरोदे यांना 19 मार्च 2024 पर्यंत लेखी माफी मागण्याची संधी देण्यात आली. पण त्यांनी माफी मागण्यास ठाम नकार दिला. त्यामुळे आता बार कौन्सिलने या तक्रारीवर कारवाई करत त्यांची वकिलीची सनद 3 महिन्यांसाठी रद्दबातल केली आहे.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी वकील विवेकानंद घाटगे यांच्या नेतृत्वात एक समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने असीम सरोदे यांच्या भाषणाचे ट्रान्सक्रिप्ट व व्हिडिओ क्लिप पाहिल्या. त्यात असीम सरोदे स्पष्टपणे म्हणताना दिसून येत आहेत की, ‘राज्यपाल फालतू आहेत’ व ‘न्यायालय सरकारच्या दबावाखाली आहे’. अशा विधानांमुळे जनतेमध्ये न्यायालयाविषयी अविश्वास निर्माण होतो. न्यायव्यवस्था व घटनात्मक पदांविषयी आदर राखणे वकिलाची नैतिक व कायदेशीर जबाबदारी आहे. वकील हे ‘न्यायालयाचे अधिकारी’ (ऑफिसर ऑफ द कोर्ट) असतात. त्यामुळे त्यांनी न्यायसंस्थेविषयी संयम व सन्मान राखला पाहिजे, असे बार कौन्सिलच्या समितीने म्हटले आहे.

असीम सरोदे हे सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष व चिन्हाविषयी सुरू असलेल्या सुनावणीत सहभागी असणाऱ्या वकिलांपैकी एक आहेत. पण आता त्यांची सनद रद्द झाल्यामुळे त्यांना या प्रकरणात कोणताही युक्तिवाद करता येणार नाही.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *