पान मसाल्याची जाहीरात केल्याने या अभिनेत्यांच्या अडचणीत होणार वाढ

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पान मसाल्याची जाहिरात करून तरुणांची दिशाभूल करणं आता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना चांगलच महागात पडणार आहे. या तिघांविरोधात ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अलीकडेच, कोटा येथील एका सामाजिक कार्यकर्ते इंद्रमोहन सिंग हनी यांनी अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांच्याविरुद्ध कोटा ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. त्याने तक्रारीत म्हटलं आहे की, हे कलाकार केशरयुक्त पान मसाल्याची जाहिरात करून तरुणांची फसवणूक करतायत. त्यामुळे आता आयोगाने या तीन बॉलिवूड सेलिब्रिटी आणि उत्पादन तयार करणाऱ्या कंपनीविरुद्ध खटला दाखल केला आहे. तसेच या प्रकरणी 21 एप्रिलपर्यंत उत्तर मागितलं आहे.
बॉलीवूड स्टार शाहरुख खान, अजय देवगण, टायगर श्रॉफ आणि विमल पान मसालाच्या निर्मात्यांना कोटा ग्राहक न्यायालयात समन्स बजावण्यात आले आहे. कोटा येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने जिल्हा ग्राहक वाद निवारण आयोगाकडे या सर्वांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे आणि पान मसाल्याच्या जाहिरातीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तक्रारदाराचे नाव इंद्रमोहन सिंग हनी असून त्यांनी याचिकेत म्हटलं आहे की, 1 मे 2004 पासून देशात तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातींवर बंदी घालण्यात आली होती. पण त्यानंतरही काही रुपयांसाठी या चित्रपट कलाकारांकडून दिशाभूल करणारा प्रचार केला जात आहे, ज्यामुळे तरुणवर्ग वेगळ्या मार्गाने जात आहेत.
इंद्रमोहन सिंग हनी पुढे म्हणालेत की, ‘बाजारात केशरची किंमत प्रति किलो 3 लाख रुपये आहे. पण पान मसाल्याचे उत्पादक आणि काही कलाकार त्याची खोटी जाहिरात करून विक्री करत आहेत. खरं तर, हे कलाकार ज्या कंपनीची जाहिरात करतात त्या कंपनीच्या जाहिरातीत ते ‘दाणे-दाणे में केसर का दम’ आणि ‘जुबाँ केसरी’ सारख्या पंच लाईन्स म्हणताना दिसतात.
मात्र भारताव्यतिरिक्त इतर कोणत्याही देशातील कलाकार कोणत्याही प्रकारच्या नशेला किंवा समाजावर परिणाम करणाऱ्या इतर कोणत्याही गोष्टीला प्रोत्साहन देत नाहीत.’ अशा परिस्थितीत त्यांच्या खोट्या प्रचाराचा तरुणांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचं त्यांनी म्हटलं.
SL/ML/SL
25 Feb. 2025