आदिवासींच्या जमिनींच्या बेकादेशीर हस्तांतरणाची चौकशी…

मुंबई दि ९ — राज्यातील विविध जिल्ह्यातील आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना बेकायदेशीरपणे हस्तांतरित करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची चौकशी त्या त्या विभागीय आयुक्तांमार्फत करून तीन महिन्यात त्याचा अहवाल सभागृहाला सादर करण्यात येईल अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली, याबाबतची लक्षवेधी सूचना राजेंद्र गावित यांनी उपस्थित केली होती, त्यावर किरण लहामटे यांनी उपप्रश्न विचारले.
शेत जमिनीव्यतिरिक्त इतर आदिवासी जमिनी चौतीस अटी शर्तींचे पालन करून त्या बिगर आदिवासींना हस्तांतरित करण्यासाठी परवानगी देता येते मात्र १६२८ प्रकरणात तक्रारी करण्यात आल्या आहेत, त्या सगळ्यांची चौकशी करण्यात येईल असं मंत्री म्हणाले.
बनावट सही, शिक्के वापरून प्लॉट विक्री
छत्रपती संभाजी नगर मधील फुलंब्री येथील बनावट सही शिक्के वापरून प्लॉट विक्री करणे प्रकरणी संबंधित मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना निलंबित करून या सर्व प्रकरणाची चौकशी विभागीय आयुक्तांकडून करण्यात येईल अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली, याबाबतची लक्षवेधी सूचना अनुराधा चव्हाण यांनी उपस्थित केली होती.
अनधिकृत चर्च होणार निष्कासित
नंदुरबार जिल्ह्यातील खासगी तसेच शासकीय जमिनींवर अतिक्रमण करून दीडशे हून अधिक चर्चेस ची अनधिकृत बांधकामे करण्यात आली असून त्यातील काही तातडीने निष्कासित करण्यात येतील आणि उर्वरित बांधकामांची चौकशी विभागीय आयुक्तांकडून करण्यात येईल, पुढील सहा महिन्यात इतर बांधकामावरील कारवाईचे स्वरूप ठरविण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना अनुप अग्रवाल यांनी उपस्थित केली होती. ML/ML/MS