पहिल्या सौर मोहीमेतील आदित्य-L1 पोहोचले नियोजित स्थानी

 पहिल्या सौर मोहीमेतील आदित्य-L1 पोहोचले नियोजित स्थानी

छायाचित्र प्रातिनिधिक

मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) देशवासियांना अभिमानास्पद बातमी दिली आहे. भारताच्या पहिल्या सौरमोहिमेद्वारे अंतराळात पाठवण्यात आलेले आदित्य -L1 हे यान आज नियोजित स्थळी पोहोचले आहे. इस्रोचे आदित्य-L1 अंतराळयान 126 दिवसांत 15 लाख किमी प्रवास करून सन-अर्थ लॅग्रेंज पॉइंट 1 (L1) वर पोहोचले आहे. दुपारी चारच्या सुमारास हॅलो ऑर्बिटमध्ये पोहोचले. आता इथूनच पुढील पाच वर्षेे ते सूर्याचं निरीक्षण करेल, आणि मिळालेली माहिती इस्रोला पाठवेल.

इस्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधान मोदींनी भारताच्या वैज्ञानिकांचं कौतुक केलं आहे. “अगदी जटिल असं स्पेस मिशन यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन.. मी आणि संपूर्ण देश आज या वैज्ञानिकांचं कौतुक करत आहे.” अशा आशयाची पोस्ट पंतप्रधानांनी आपल्या एक्स हँडलवरून केली आहे.

लॅग्रेंज पॉइंट म्हणजे काय?
लॅग्रेंज पॉइंट (Lagrange Point) या अवकाशातील अशा जागा असतात, जिथे सूर्याचं गुरुत्वाकर्षण आणि जवळच्या एखाद्या ग्रहाचं गुरुत्वाकर्षण बल हे समान असतं. यामुळे या पॉइंटवर ठेवण्यात आलेली वस्तू एकाच ठिकाणी स्थिर ठेवण्यासाठी जास्त उर्जा खर्च करण्याची गरज भासत नाही. पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर L1 हा लॅग्रेंज पॉइंट आहे. येथे स्थिरावलेली कोणतीही वस्तू सूर्याभोवती पृथ्वीसारखेच भ्रमण करते.

एल-1 या लॅग्रेंज बिंदूवर WIND, ACE आणि डीप स्पेस क्लायमेट ऑब्जर्वेटरी हे नासाचे तीन उपग्रह आधीपासून आहेत. यासोबतच नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीने संयुक्तपणे लाँच केलेला सोलार अँड हेलिओस्फेरिक ऑब्जर्वेटरी (SOHO) हा उपग्रह देखील याठिकाणी आहे.

2 सप्टेंबर २०२३ रोजी सुरु करण्यात आलेल्या या पहिल्या सौर मोहिमेद्वारे सूर्यावरील हवामानाची गतीशीलता, सूर्याचे तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम आणि ओझोन थर यांचा अभ्यास केला जाणार आहे. सूर्याचा अभ्यास करून हवामानाचा अंदाजही अधिक अचूक होईल, असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. यामुळे अशी यंत्रणा तयार होण्यास मदत होईल, ज्याद्वारे वादळाची माहिती तात्काळ मिळेल आणि त्याची सुचना देता येईल.

SL/KA/SL

6 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *