अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारण जोरात

मुंबई दि ३– विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू झाले आहे . या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती सत्तारूढ आणि विरोधक या दोन्ही बाजूच्या अंतर्गत राजकारणाला ऊत आला असून दोन्ही बाजूचे सहयोगी पक्ष एकमेकां
विरोधामध्ये कुरघोड्या करण्यामध्ये गुंतलेले पाहायला मिळत आहेत.
काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे आणि माझ्यात कोणत्याही प्रकारचे शीतयुद्ध नसल्याचे स्पष्ट केले आहे, मात्र त्यांना वारंवार शीतयुद्ध नसल्याचे स्पष्ट करावे लागते यातच त्यांच्यात सुरू असलेल्या अंतर्गत राजकारणाचा स्पष्ट वास येत आहे. अजित पवार आणि फडणवीस यांच्यात चांगले सूत जुळल्याचे दिसत असले तरी एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यात मात्र विसंवाद असल्याचे वारंवार दिसून येत आहे. म्हणूनच नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही . याखेरीज शिंदे सरकारच्या काळात असलेले अनेक निर्णय वादग्रस्त ठरले असून त्याच्या चौकशी सुरू झाल्या असून काहींना स्थगिती देखील मिळाल्याचे बोलले जात आहे.
दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीत देखील मोठा विसंवाद असून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदावरती आता काँग्रेस पक्षाने आपला दावा ठोकला आहे. आपले संख्याबळ जास्त असल्यामुळे हे पद आपल्याला मिळावे अशा पद्धतीचे पत्र काँग्रेसने विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना देण्याचे निश्चित केले आहे. सध्या हे पद शिवसेना उबाठाकडे आहे. तर दुसरीकडे विधानसभेमध्ये आवश्यक संख्याबळ नसताना देखील विधानसभेचे विरोधी पक्ष नेते पद आपल्यालाच मिळावे असे पत्र शिवसेना उबाठा पक्षाच्या विधिमंडळ गटाने विधानसभा अध्यक्षांकडे देण्याचे निश्चित केले आहे.