संजय आढाळगे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार
टिटवाळा, दि २०
मुंबई पत्रकार संघ, आझाद मैदान, मुंबई येथे दर्पण पत्रकार व संपादक दिनानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात टिटवाळा येथील रहिवाशी असलेले पत्रकार, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून उल्लेखनीय योगदान देणारे संजय आढाळगे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
दर्पण पत्रकार व संपादक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. पत्रकारिता, शिक्षण आणि समाजकारण या तिन्ही क्षेत्रांत सातत्याने कार्य करत समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये संजय आढळे यांच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष सुभाष पांडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे रेल्वे स्टेशन प्रबंधक वायकर, समतानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डीआर पी, आबेदान चंदनशिव, तसेच दीपाली कांबळे उपस्थित होत्या. याशिवाय दर्पण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील पांडे, राष्ट्रीय दर्पण पत्रकार संघाचे सहायक संचालक गृहमंत्रालय विजय कवळे, गृहरक्षक दल मंत्रालयाचे विकास थोरात आणि जलसंपदा विभागाचे आदे आदी मान्यवरांनीही या सोहळ्यास हजेरी लावली.संजय आढळे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडत जनजागृती केली असून, सामाजिक कार्यातूनही त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या या सातत्यपूर्ण व समर्पित कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना त्यांनी हा सन्मान आपल्या कार्याची पावती असल्याचे सांगत भविष्यातही समाजासाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. या सोहळ्याने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्तींना प्रेरणा देणारा हा कार्यक्रम ठरला. समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केल्याने अशा उपक्रमांना अधिक बळ मिळते, अशी भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.KK/ML/MS