महायुती की महाविकास आघाडी? उद्या कळणार मतदारांचा कौल
मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राच्या १५ व्या विधानसभेसाठी परवा (दि. २०) राज्यभरात एकाच टप्प्यात मतदान सुरळीत पार पडले. त्यानंतर आता महाराष्ट्रात सत्तेच्या पटावर कोण बाजी मारते याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघांमध्ये पार पडलेल्या मतदानात जनता काय कौल देते हे उद्या स्पष्ट होणार आहे. उद्या सकाळपासून राज्यभर मतमोजणी होणार आहे. त्यामुळे संध्याकाळ पर्यंत राज्यात महायुती सत्तेत येणार की महाविकास आघाडी हे चित्र स्पष्ट होणार आहे.
या निवडणुकीत महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान पार पडले. राज्यात सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले असून सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा मतदानाचा टक्का वाढला असून मागच्या ३० वर्षांतील हे सर्वाधिक मतदान आहे. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात ४ हजार १४० उमेदवारांचे राजकीय भवितव्य उद्या उघड होणार आहे.
मुंबईत ३६ मतदारसंघासाठी ३६ केंद्रांवर ही मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी २७०० हून अधिक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतमोजणी प्रक्रिया सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. मतदान झाल्यानंतर सर्व ईव्हीएम व व्हीव्हीपॅट संयंत्रे संबंधित मतदारसंघांच्या स्ट्रॉग रूममध्ये अतिशय कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. एकूण ३६ स्ट्रॉग रूमच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव सुरक्षा दल (सीआरपीएफ), केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) यांच्यासह राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) व पोलीस तैनात आहेत.हे सर्व स्ट्रॉग रूम सीसीटीव्ही निगराणीखाली आहेत. उद्या मुंबईतील मतमोजणी केंद्रापासून ३०० मीटरपर्यंत गर्दी करण्यास बंदी घातली आहे.
SL/ML/SL
22 Nov. 2024