अदानी समूह गुजरातमध्ये उभारणार अंतराळातूनही दिसणारे ग्रीन एनर्जी पार्क

 अदानी समूह गुजरातमध्ये उभारणार अंतराळातूनही दिसणारे ग्रीन एनर्जी पार्क

मुंबई, दि्. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिडेनबर्ग प्रकरणातून दिलासा मिळाल्या पासून आता अदानी समूहाचा वारू आता पुन्हा चौफेर उधळू लागला आहे.अदानी समूहाने गुजरातमध्ये 2 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूकीची घोषणा केली आहे. हा समूह प्रामुख्याने हरित ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ग्रीन एनर्जी पार्कच्या बांधकामाचा समावेश आहे. या गुंतवणुकीमुळे गुजरातमध्ये एक लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी व्हायब्रंट गुजरात परिषदेमध्ये सांगितले. यावेळी देशातील मोठ्या उद्योग समूहांचे प्रमुखही उपस्थित होते.

गौतम अदानी म्हणाले की, गेल्या परिषदेत समूहाने राज्यात 55 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले होते. त्यापैकी 50,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक झाली आहे. आमचा समूह कच्छमध्ये 25 स्क्वेअर किलोमीटरमध्ये पसरलेल्या 30 GW क्षमतेचा ग्रीन एनर्जी पार्क बनवत आहे, जो अंतराळातूनही दिसेल. स्वावलंबी भारतासाठी आम्ही हरित पुरवठा साखळीचा विस्तार करत आहोत आणि सर्वात मोठी एकात्मिक अक्षय ऊर्जा परिसंस्था निर्माण करत आहोत. यामध्ये सोलर पॅनेल, विंड टर्बाइन, हायड्रोजन इलेक्ट्रोलिसिस, ग्रीन अमोनिया आणि पीव्हीसी यांचा समावेश आहे. याशिवाय तांबे आणि सिमेंट उत्पादनाचाही विस्तार केला जात आहे.

गौतम अदानी यांनी म्हटले की, 2014 पासून भारताचा जीडीपी आणि दरडोई उत्पन्न वाढले आहे. जी 20 नेतृत्वाने एक बेंचमार्क सेट केला आहे. आपले पंतप्रधान भाकीत करत नाहीत, तर भविष्य घडवतात. माझा विश्वास आहे की 2047 पर्यंत भारत पूर्णपणे विकसित होईल.

यावेळी स्टील किंग लक्ष्मी मित्तल म्हणाले, स्वावलंबनामध्ये स्टीलची महत्त्वाची भूमिका आहे. पंतप्रधानांनी 4 वर्षांपूर्वी गुजरातमधील हजीरा प्रकल्पाचे उद्घाटन केले होते. हा प्रकल्प 2026 पर्यंत पूर्ण होईल. दुसऱ्या टप्प्यासाठी आज सामंजस्य करार करण्यात आला. हजीरा हे 24 दशलक्ष टन स्टीलचे उत्पादन करणारी जागा असेल. आम्ही पोलाद, अक्षय ऊर्जा आणि हायड्रोजन तंत्रज्ञानामध्येही गुंतवणूक करत आहोत. पुढील 20 वर्षे देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष तोशिहिरो सुझुकी यांनी सांगितले की, मारुती सुझुकी इंडिया गुजरातमध्ये आपला दुसरा उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी 35 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. या प्लांटची क्षमता वार्षिक 10 लाख युनिट असेल. यामुळे गुजरातमध्ये आमची वार्षिक उत्पादन क्षमता 20 लाख युनिट असेल. जपानी कंपनी सुझुकी मोटरची मारुती सुझुकी इंडियामध्ये सुमारे 58 टक्के भागीदारी आहे आणि ती देशातील सर्वात मोठी वाहन कंपनी आहे.

SL/KA/SL

10 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *