अदानी समुहाचा आता शिक्षण क्षेत्रातही प्रवेश

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अदानी समूह देशातील विविध क्षेत्रांमध्ये झपाट्याने विस्तार करत आहे. सर्वच उद्योगांमध्ये अग्रेसर असलेला अदानी समुह आता शिक्षण क्षेत्रातही प्रवेश करणार आहे. अदानी समुहाने देशाच्या विविध भागात शाळा सुरु करण्यासाठी २००० कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. या पैशातून देशभरात २० शाळा उभारण्यात येणार आहेत. या शाळांमधील ३० टक्के जागा आर्थिक दृष्ट्या मागासवर्गियांसाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहेत.
अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी त्यांचा धाकटा मुलगा जीत अदानीच्या लग्नात १० हजार कोटी रुपये दान करण्याची घोषणा केली होती. या शाळांची निर्मिती त्याच वचनाचा एक भाग आहे. अदानी फौंडेशन जीईएमएस एज्युकेशनच्या संयुक्त विद्यमाने या शाळा उभारणार आहेत. या माध्यमातून पुढील तीन वर्षात दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या संधीची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. यातील पहिली शाळा लखनऊ मध्ये सुरु होणार असून त्याचे शैक्षणिक सत्र २०२५-२६ पासून सुरु होईल. सीबीएसई अभ्यासक्रम असलेल्या या शाळा सुरुवातीला मोठ्या शहरांमध्ये व नंतर तुलनेने लहान शहरांमध्ये सुरु होणार आहेत.
SL/ML/SL
18 Feb. 2025