अदानी समूहाने बदलले धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे नाव

मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी धारावीचा आता कायापालट होऊ घातला आहे. अदानी समूहाकडून धारावी पुनर्विकास प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे नाव बदलून अदानी समूहाने नवभारत मेगा डेव्हलपर्स असे केले आहे.नामांतरामागचे कारण स्पष्ट करताना अदानी समूहाने एका निवेदनात म्हटले आहे की, आधुनिक, सर्वसमावेशक आणि गतिमान समुदाय तयार करण्याच्या कंपनीच्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी हे रिब्रँडिंग करण्यात आले आहे. हा बदल देशभरातील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाच्या विशाल आणि ऐतिहासिक कार्याशी संबंधित किंवा लाभार्थी प्रत्येकासाठी व्यापक आणि उज्ज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी कंपनीचा नवीन दृष्टीकोन आणि दायित्व दर्शवितो, असे निवेदनात म्हटले आहे.
नामांतराबाबत प्रतिक्रिया देताना डीबीएचे समन्वयक राजू कोरडे म्हणाले की, नवभारत मेगा डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड (Navbharat Mega Developers) ही अदानीची जुनी कंपनी असल्याने हे नवीन नाव नाही. दरम्यान, धारावी पुनर्विकास प्रकल्पात अदानी समूहाचा ८० टक्के आणि महाराष्ट्र सरकारचा २० टक्के वाटा आहे. नवीन नावाच्या कंपनीतील शेअरहोल्डिंग अपरिवर्तित राहणार आहे. धारावीही जगातील सहावी सर्वात दाट लोकवस्ती आहे. यात गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील लोकांची मोठ्या प्रमाणावर वसाहत आहे.
SL/ML/SL
30 Dec. 2024