अभिनेते सयाजी शिंदेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी, हिंदी बरोबरच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रातही सक्रीय कार्यरत आहेत. दुष्काळी भागात त्यांनी घेतलेले वृक्ष लागवडीचे काम वाखाण्याजोगे आहे. चित्रपटांमधून राजकीय पुढाऱ्याची भूमिका रंगवणारे सयाजी शिंदे हे आता प्रत्यक्ष आयुष्यातही राजकीय आखाड्यात उतरले आहेत. शिंदे यांनी आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर असताना अजित पवारांच्या पक्षाला एक ग्लॅमरस चेहरा लाभला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत अभिनेते सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. अभिनेते सयाजी शिंदे हे आता पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम करणार आहेत.
पक्ष प्रवेश कार्यक्रमादरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी अभिनेते सयाजी शिंदे यांचं कौतुक केलं. भुजबळ म्हणाले, “आता उद्या दसरा आहे. पण आम्हाला आजच दसरा साजरा करण्याचं भाग्य लाभलं. खरं तर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर सयाजी शिंदे यांनी आपल्या कामाने मोठा ठसा उमटवला आहे. त्यांनी मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य अशा विविध भाषेच्या चित्रपटांमध्ये अभिनय केला. ते अभिनेते आहेतच, पण आता ते नेते देखील झाले आहेत. सयाजी शिंदे यांनी सामाजिक क्षेत्रात मोठं काम केलं आहे. राज्यात ठिकठिकाणी वृक्षारोपण त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे”, असं म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी सयाजी शिंदे यांचं कौतुक केलं.
SL/ML/SL
11 Oct. 2024