अभिनेते सतीश शहा यांचे निधन
मुंबई, दि. २५ : ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह (७४) यांचे आज मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. किडनी फेल होण्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सतीश शाह हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत लोकप्रिय आणि बहुआयामी कलाकार होते.
त्यांनी ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या टीव्ही मालिकेत इंद्रवदन साराभाई ही भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. तसेच ‘जाने भी दो यारो’, ‘हम साथ साथ हैं’, ‘मैं हूं ना’, ‘कल हो ना हो’, ‘कहो ना प्यार है’, ‘जुड़वा’, ‘हीरो नं. १’ अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी विनोदी आणि लक्षवेधी भूमिका साकारल्या. त्यांच्या अभिनयशैलीत सहजता, विनोद आणि भावनिकता यांचा सुरेख मिलाफ होता.
सतीश शाह यांनी १९८० च्या दशकात दूरदर्शनवर ‘ये जो है जिंदगी’ आणि ‘फिल्मी चक्कर’ सारख्या मालिकांमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी टीव्ही आणि चित्रपट माध्यमात सातत्याने काम केले. त्यांच्या निधनाने भारतीय मनोरंजन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी त्यांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आणि त्यांच्या जाण्याने एक महान कलाकार गमावल्याची भावना व्यक्त केली. करण जोहर, फराह खान, जॉनी लीव्हर यांसारख्या अनेक नामवंत कलाकारांनी सतीश शाह यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सतीश शाह यांचे अंतिम संस्कार उद्या रविवार, २६ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहेत.
SL/ML/SL