मातृभाषा मराठी पण विचार करतो उर्दूत-अभिनेता सचिन पुन्हा चर्चेत

मुंबई, दि. ७ : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि बहुप्रतिभावान अभिनेता सचिन पिळगावकर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. यावेळी कारण आहे त्यांचा एक भावनिक आणि भाषिक दृष्टिकोनातून विचार करणारे विधान – “माझी मातृभाषा मराठी आहे, पण मी विचार करतो उर्दूत.” हे विधान त्यांनी अलीकडे एका मुलाखतीत व्यक्त केले आणि त्यावरून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या.
सचिन पिळगावकर नुकतंच ‘बहार ए उर्दू’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी भावना व्यक्त करताना सचिन यांनी असे म्हटले की, ‘माझी मातृभाषा मराठी आहे, पण मी विचार उर्दू भाषेतून करतो. मला जर माझी बायको किंवा इतर कोणीही रात्री 3 वाजता जरी उठवलं, तरी मी उर्दू भाषेत बोलूनच जागा होतो. मी उर्दूतून केवळ जागा होत नाही, तर मी उर्दू भाषेसोबत झोपतोही. उर्दू एक अशी सवत आहे जी माझ्या बायकोला आवडते. माझं उर्दू भाषेवरील प्रेम माझ्या बायकोला आवडतं.’
सचिन पिळगावकर हे केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपट, दूरदर्शन आणि रंगभूमीवरही आपली छाप पाडणारे कलाकार आहेत. त्यांनी बालकलाकार म्हणून सुरुवात केली आणि नंतर दिग्दर्शक, लेखक, गायक अशा विविध भूमिकांमध्ये आपली प्रतिभा सिद्ध केली. त्यांच्या भाषिक जाणिवा आणि विविध भाषांवरील प्रभुत्व हे त्यांच्या कलात्मकतेचे एक महत्त्वाचे अंग आहे.
“विचार उर्दूत करतो” या विधानामागे त्यांनी स्पष्ट केले की उर्दू ही भाषा त्यांना भावनात्मक अभिव्यक्तीसाठी अधिक प्रभावी वाटते. उर्दूतील शब्दांची सौंदर्यपूर्णता, गहनता आणि अभिव्यक्तीची ताकद ही त्यांना विचार करताना अधिक जवळची वाटते. यामुळेच त्यांच्या लेखनात, संवादात किंवा अभिनयात उर्दूचा प्रभाव जाणवतो.
SL/ML/SL 7 Oct. 2025