महिलेकडून कुत्र्यावर अॅसिड हल्ला
मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुक्या प्राण्यांना जीव लावणारी माणसे पुष्कळ असतात परंतु मुक्या जीवांवर प्राणघातक हल्ला झाल्याच्या घटना उघडकीस आल्यावर माणसातील पशुत्वाचे दर्शन घडते. मालाडमध्ये मालवणी परिसरात कुत्र्यावर अॅसिड फेकल्याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मालवणी गेट क्रमांक येथील म्हाडाच्या वसाहतीत बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत कुत्रा गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मालवणी गेट क्रमांक म्हाडा वसाहतीतील स्वप्न पूर्ती या इमारतीच्या आवारात बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास कुत्र्याचा किंचाळण्याचा आवाज आल्याने स्थानिक लोक घराबाहेर आले. त्यावेळी लोकांनी कुत्र्याकडे धाव घेतली असता त्याच्या अंगावर ज्वलनशील वस्तू टाकून त्याला जखमी केल्याचे लोकांच्या लक्षात आले. यानंतर जखमी कुत्र्याला एका प्राणी मित्र संस्थेच्या रुग्णालय वाहिकेतून उपचारासाठी नेले. तिथे या कुत्र्यावर अॅसिड टाकल्याचे निष्पन्न झाले.
कुत्र्यावर उपचार करून घरी परतल्यानंतर स्थानिक लोकांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये एका ३५ वर्षीय महिला कुत्र्याच्या अंगावर अॅसिड फेकताना दिसली. यानंतर स्थानिक लोकांनी या महिलेविरोधात मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी संबंधित महिलेला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी महिला मांजरांना खाऊ घालते. त्यावेळी जखमी कुत्रा मांजराच्या अंगावर धावून जातो, याच रागातून आरोपी महिलेने कुत्र्याच्या अंगावर अॅसिड हल्ला केल्याची कबूली दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
SL/KA/SL
18 Aug 2023