प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणारे आचार्य दीक्षित यांचे निधन

वाराणसी, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करणारे आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित (86) यांचं आज सकाळी वाराणसी येथे निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर मणिकर्णिका घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लक्ष्मीकांत दीक्षित हे मूळचे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील आहेत. परंतु त्यांच्या अनेक पिढ्या काशी येथे वास्तव्यास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 22 जानेवारी रोजी अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्रभू श्रीराम यांची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. या अभूतपूर्व सोहळ्याचे प्रमुख आचार्यपद आचार्य दीक्षित यांनी भूषवले होते. दीक्षित हे मीरघाट, वाराणसी येथे असलेल्या सांगवेद महाविद्यालयाचे वरिष्ठ आचार्य होते. आचार्य दीक्षित यांच्या निधनाने हिंदू सांप्रदायावर मोठी शोककळा पसरली आहे. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींसह अनेक राजकीय नेत्यांनी लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या निधनावर x या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट लिहून शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिलंय की, ”देशाचे महान विद्वान आणि सांगवेद विद्यालयाचे यजुर्वेद शिक्षक लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या निधनाची दुःखद बातमी समजली. दीक्षितजी हे काशीच्या विद्वान परंपरेतील एक प्रसिद्ध व्यक्ती होते. काशी विश्वनाथ धाम आणि राम मंदिराच्या उद्घाटन समारंभात मी त्यांच्यासोबत उपस्थित होतो. आचार्य दीक्षित यांच्या निधनाने समाजाची मोठी हानी झाली असून ती कधीही भरून काढता येणार नाही.”
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिलंय की, ” आचार्य दीक्षित यांनी संस्कृत भाषा आणि भारतीय संस्कृतीसाठी केलेल्या सेवेतून ते सदैव स्मरणात राहतील. प्रभू श्रीराम या महातम्याला आपल्या चरणी स्थान देवो आणि त्यांच्या शिष्यांना व अनुयायांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रभू श्री राम चरणी प्रार्थना. ओम शांती!”
SL/ML/SL
22 June 2024