महाड दापोली मार्गावर अपघाताची मालिका चालूच !

महाड दि ६ (मिलिंद माने)– महाड दापोली मार्गावर एसएमसी कन्स्ट्रक्शन कंपनीने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणामुळे निसरडा झालेल्या रस्त्यावर महिन्याभरात तब्बल १८अपघात झाल्यानंतर. देखील सार्वजनिक बांधकाम खाते अद्याप सुस्त झोपी गेल्याचे पाहण्यास मिळत असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
महाड दापोली मार्गावरील महाड दादली पूल ते मंडणगड तालुक्यातील लाटवण हद्दी पर्यंतचा रस्ता एसएमसी कन्स्ट्रक्शन कंपनीकडे दहा वर्ष देखभाल दुरुस्ती साठी वर्ग केला आहे हा रस्ता सुस्थितीत असताना एसएमसी कन्स्ट्रक्शन कंपनीने या रस्त्यावर एप्रिल महिन्यामध्ये डांबर टाकून ग्रिट मारून हा रस्ता पुन्हा नवीन करण्याचा प्रकार केला मात्र अल्पावधीतच अवकाळी पावसामुळे या रस्त्यावर अपघाताची मालिका चालू झाली.
अवकाळी पाऊस मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून म्हणजेच ६ मे पासून चालू झाला. आज एक महिन्याचा कालावधी पूर्ण होत असताना या मार्गावर एसटी बसेस ,शिवशाही बस, खाजगी मालवाहतूक करणारे ट्रक व खाजगी कार यांच्याबरोबरच मोटर सायकलस्वार व सहा आसनी रिक्षा अशा तब्बल १८ घटना या अपघाताच्या घडल्या आहेत.
महाड दापोली मार्गावर आज दुपारच्या सुमारास पहिला अपघात ज्या करंजाडी गावाच्या हद्दीत घडला त्याच ठिकाणी पुन्हा एक आयशर ट्रक रस्त्यावरून घसरून साईड पट्टीवर गेला मात्र सुदैवाने जीवित हानी टळली.
महाड दापोली मार्गावर अपघाताची मालिका चालूच असताना आज घडलेला १८ अपघात असताना देखील. ज्या एसएमसी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या गैरकारभारामुळे या रस्त्यावर अपघाताची मालिका चालू झाली आहे त्या कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याचे धाडस सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता तुकाराम सनाळकर हे का दाखवीत नाहीत असा सवाल या मार्गावरील प्रवास करणारे प्रवासी विचारीत आहेत.
यांचे ठेकेदाराशी काही लागेबांधे आहे का की एसएमसी कंट्रक्शन कंपनीला वाचवण्यासाठी उपविभागीय अभियंता तुकाराम सनाळकर हे केवळ आपल्या कार्यालयात बसून बघ्याची भूमिका का घेतात असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे दोन दिवसापासून पावसाला मोठ्या प्रमाणावर कोकणात सुरुवात होणार आहे या काळात या रस्त्यावर अपघात घडून जीवित हानी झाल्यास याला उपविभागीय अभियंता तुकाराम सनाळकर हेच जबाबदार असतील अशा प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थांकडून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंता महेश नामदे यांना विचारले जात आहेत.