आठवडाभरापूर्वीच उद्घाटन झालेल्या अटल सेतूवर अपघात

नवी मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आठवडाभरापूर्वीच शिवडी न्हावा शेवा अटल सागरी सेतूचे लोकार्पण करण्यात आले होते. या मार्गावर काल पहिला अपघात घडला. रविवारी दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. एक कार दुभाजकाला धडकल्याने हा उपघात झाला. या गाडीत एकूण पाच जण होते. पण सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. पण दुभाजकाला झालेली ही धडक इतकी गंभीर होती की, या कारचे पूर्णपणे नुकसान झाले.
दरम्यान ही कार ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आलीये. चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही गाडी दुभाजकाला जाऊन धडकली, अशी माहिती पोलिसांनी दिली. न्हावा शेवा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमध्ये सुमारे पाच जण प्रवास करत होते आणि कारमधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.”
न्हावा शेवा पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात कसा घडला याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. त्यानुसार चालकावर रॅश ड्रायव्हिंगचा देखील दाखल करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. रविवार असल्याने या मार्गावर जर वर्दळ होती. तसेच अपघात घडल्यानंतर प्रत्यक्षात काय झाले हे पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. मात्र प्रवासी सुखरुप बाहेर असल्याने काही मिनिटांतच वाहतूक सुरळीत करण्यासाठी गाडी बाजूला करण्यात आली.
एकूण 22 किमीचा हा मार्ग असून त्यातील 16.80 किमी रस्ता समुद्रातून आहे. हा भारतातील सर्वाधिक लांबीचा समुद्री पुल असून जगात हा 12 व्या स्थानी आहे. तब्बल 18 हजार कोटी रुपये खर्चून बनवण्यात आलेला हा प्रकल्प मुंबईसह, नवी मुंबई, रायगड आणि इतर शहरांमधील अंतर केवळ 20 मिनिटांवर आणणार आहे. तब्बल दोन तासांचा वेळ वाचणार आहे.
SL/KA/SL
22 Jan. 2024