राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी होणार कायम
नागपूर दि १२ : राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दहा वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून करण्यासंदर्भात येत्या मार्चपर्यंत सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याचे मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिली.
सुधीर मुनगंटीवार यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. सर्व कर्मचाऱ्यांना दर महिन्याला पगार होईल याची काळजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी यंत्रणा अद्ययावत करण्यात आलेली आहे. यासोबतच वैद्यकीय बिलांसाठी आता ऑनलाइन पद्धत राबवण्यात येईल अशी माहिती देखील आबिटकर यांनी यावेळी दिली.
राज्यात सर्व जिल्ह्यात उमेद मॉल
राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी उमेद मॉल उभारण्यात येतील, त्यासाठी 200 कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला असून येत्या वर्षभरात त्यातील 10 मॉल उभारण्यात येतील अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. याबाबतचा मूळ प्रश्न राणा जगजीत सिंग पाटील यांनी उपस्थित केला होता. त्यावर मुरजी पटेल, विजय वडेट्टीवार, योगेश सागर आदींनी उपप्रश्न विचारले.
राज्यात पंधरा हजार शिक्षकांच्या जागा रिक्त
राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या 15,158 इतक्या जागा रिक्त असून त्यासाठीची पदभरती प्रक्रिया लवकरच राबवली जाईल अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या संदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात दिली.
याबाबतचा मूळ प्रश्न मोहन मते यांनी उपस्थित केला होता, त्यावर विजय वडेट्टीवार ,नाना पटोले, नमिता मुंदडा आदींनी उपप्रश्न विचारले. आतापर्यंत 66 हजार शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे, मात्र बदली धोरण नव्यानं आणण्याचा विचार सुरू आहे. मे महिन्यापर्यंत ही बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल अशी ग्वाही देखील मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी दिली.ML/ML/MS