ताल–सुरांच्या मिलाफाने पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाची बहारदार सांगता

 ताल–सुरांच्या मिलाफाने पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाची बहारदार सांगता

पुणे, दि २३: तबल्याच्या सुमधुर तालावर फिरणारी पावले, त्यातून साकारलेले अप्रतिम कथक नृत्य, संतूरच्या मंद सुरांनी प्रफुल्लित झालेले वातावरण आणि सुस्वर गायन अशा सुर, ताल आणि लय यांच्या त्रिवेणी संगमातून विसाव्या पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचा बहारदार समारोप झाला.

तरंगिनी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि ‘आपला परिसर’ संस्थेतर्फे कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित या महोत्सवाच्या शेवटच्या सत्रात ज्येष्ठ कथक नृत्यांगना नयनिका घोष, पद्मश्री पंडित सतीश व्यास (संतूर) आणि ज्येष्ठ गायिका श्रुती सडोलीकर-काटकर यांच्या सादरीकरणाने रसिकांना अविस्मरणीय अनुभव दिला.

शेवटच्या सत्राची सुरुवात नयनिका घोष यांच्या कथक नृत्याने झाली. धमार रागातील बंदिशींवर आधारित त्यांच्या नृत्याने सुरुवातीलाच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ‘आज खेलो शाम रंगोली’ या ठुमरीद्वारे त्यांनी होळीचा रंगतदार आविष्कार सादर करत श्रीकृष्ण विषयक गीत-नृत्याचा सुंदर संगम उलगडला. त्यांच्या सादरीकरणाला कार्तिक स्वामी (तबला), आशिष गंगावणे (पखवाज), यशवंत थिटे (हार्मोनियम) आणि अर्पिता वैशंपायन (स्वरसाथ) यांची उत्तम साथ लाभली. यावेळी माजी उपमहापौर अंकुश काकडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यानंतर पद्मश्री पंडित सतीश व्यास यांनी संतूर वादनाने मैफिलीला उंची दिली. धनकोरी कल्याण रागातील त्यांच्या सादरीकरणाने सभागृहातील वातावरण अधिकच भारावून गेले. रोहित मुजुमदार (तबला) यांनी त्यांना समर्थ साथ दिली. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

महोत्सवाची सांगता ज्येष्ठ गायिका श्रुती सडोलीकर-काटकर यांच्या प्रभावी गायनाने झाली. त्यांच्या सुरेल सादरीकरणाला सुधीर नायक (हार्मोनियम) आणि भरत कामत (तबला) यांनी साथ दिली.

याच वेळी ज्येष्ठ हार्मोनियम वादक प्रमोद मराठे यांना ‘पंडित मंगेश मुळे संगतकार पुरस्कार’ श्रुती सडोलीकर-काटकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

संपूर्ण महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, सुर-ताल-लय यांच्या अद्भुत मिलाफाने सजलेल्या या महोत्सवाने शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा पुन्हा अधोरेखित केली.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *