‘अबब विठोबा बोलू लागला ’ प्रसिद्ध बालनाट्य पुन्हा रंगभूमीवर
मुंबई, दि. 10 :
एकेकाळी गाजलेलं आणि प्रेक्षकांना खळखळून हसवणारं ‘अबब विठोबा बोलू लागला’ हे लोकप्रिय बालनाट्य पुन्हा एकदा रंगभूमीवर धम्माल करायला सज्ज झालं आहे. हे नाटक प्रामुख्याने सुधा करमरकर (बालरंगभूमीच्या जननी) यांच्या तालमीत तयार झालेले असून, बालकलाकारांसाठी एक उत्तम संस्कारक्षम नाटक म्हणून ओळखले जाते. एका छोट्या मुलाचा विठ्ठलाशी असलेला संवाद, प्रेम आणि भाबडेपणा यावर आधारित ही कथा आहे. विठ्ठल बोलू लागतो, हा कल्पनाविलास नाटकातून मांडला आहे. आता नवीन संचात प्रशांत गिरकर ‘अबब विठोबा बोलू लागला’ या नाटकाचं दिग्दर्शन करत असून, त्यांच्या दिग्दर्शनातून या नाटकाला आधुनिक सादरीकरणाची जोड मिळाली आहे.
अनेक वर्षे ‘हास्यजत्रा’त कोकणी व्यक्तिरेखेमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते प्रभाकर मोरे ‘ अबब विठोबा बोलू लागला ’ या बालनाट्यात पुजाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहेत. यासाठी प्रमाण भाषेत संवाद साधण्याचं मोठं आव्हान त्यांनी यशस्वीपणे पेललं आहे.
बालनाट्याचे पुढील प्रयोग १६ एप्रिल गुरु दु ४:३० काशीनाथ घाणेकर, ठाणे १७ एप्रिल शुक्र स ११:३० प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली १७ एप्रिल शुक्र संध्या ७:३० शिवाजी मंदिर, दादर येथे होणार आहेत. १ ते ३ मे कोकण दौरा असणार आहे.
पत्रकार परिषदेत प्रभाकर मोरे यांनी सांगितलं, “प्रमाण भाषेत बोलणं माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं. इतकी वर्षं कोकणी व्यक्तिरेखा साकारल्यानंतर हा बदल सोपा नव्हता. त्यामुळे या नाटकासाठी मला अधिक वेळ देऊन मेहनत घ्यावी लागली. पण त्या प्रक्रियेत खूप काही नवीन शिकायला मिळालं.”
SL/ML/SL