‘आम्ही साहित्यप्रेमी’तर्फे ओरोसला २० सप्टेंबर रोजी आचार्य अत्रेंच्या साहित्यावर कार्यक्रम

 ‘आम्ही साहित्यप्रेमी’तर्फे ओरोसला २० सप्टेंबर रोजी आचार्य अत्रेंच्या साहित्यावर कार्यक्रम

सिंधुदुर्ग, दि १७ :
आम्ही साहित्यप्रेमी’च्या सप्टेंबरच्या मासिक कार्यक्रमानिमित्त शनिवारी २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता ‘वंदन आचार्य अत्रे यांना’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ओरोस, जैतापकर कॉलनी येथील दत्तराज सहकारी सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल.

‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ या साहित्यिक व्यासपीठाचा हा सातवा मासिक कार्यक्रम आहे. संपादक, लेखक, कवी, विडंबनकार, नाटककार, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, राजकीय नेते अशा कित्येक भुमिका लिलया पेलणारे आणि प्रत्येक क्षेत्रावर स्वतःची अमिट नाममुद्रा उमटवणारे आचार्य प्रल्हाद केशव उर्फ प्र. के. अत्रे यांची जयंती अलीकडेच झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात अग्रणी असलेले आचार्य अत्रे यांचे आयुष्य आणि कार्यकर्तृत्व अफाट आहे. जयंतीनिमित्त त्यांना वंदन करण्यासाठी हा कार्यक्रम होणार आहे..

या कार्यक्रमात पुरुषोत्तम लाडू कदम (अत्रे जीवनदर्शन), डॉ. सई लळीत (आचार्य अत्रे यांची नाटके व विडंबन काव्य), सतीश लळीत (आचार्यांचे किस्से), सुधीर गोठणकर, अपर्णा जोशी व प्रिया आजगावकर (कवितावाचन), अत्रे यांचे विनोद (नम्रता रासम), ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे (अत्रे यांचे साहित्य) असे कार्यक्रम सादर होतील.

ओरोस येथे मार्च महिन्यात स्थापन झालेल्या ‘आम्ही साहित्यप्रेमी’ या व्यासपीठाने आतापर्यंत सहा मासिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. लेखक प्रवीण बांदेकर यांचे व्याख्यान व कवी दादा मडकईकर यांच्या कविता, ‘मला आवडलेले पुस्तक’, कथाकथन, मानसोपचारतज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांची प्रकट मुलाखत, ‘आषाढसरी’ कविसंमेलन, युवा चित्रकार अक्षय मेस्त्री याची मुलाखत अशा या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांना ओरोस परिसरातील रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

हा कार्यक्रम सर्वांना खुला आहे. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व कार्यक्रम वेळेवर सुरु व्हावा, यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन समन्वयक सतीश लळीत व डॉ. सई लळीत यांनी केले आहे.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *