अधिकाऱ्यांवर पुन्हा दबावाचे राजकारण; पुण्यात अवैध व्यवसायांविरोधात भीमशक्ती संघटनेचे आंदोलन

पुणे, दि १६: महिला आयपीएस अधिकाऱ्यावर दबाव टाकल्याच्या प्रकरणाची धग अजून शांत होत नाही तोच पुन्हा प्रशासनावर दबाव आणण्याची घटना समोर आली आहे. एका मोठ्या नेत्याने थेट प्रशासनावर दबाव टाकून कारवाईस विरोध केल्याचा आरोप भीमशक्ती सामाजिक संघटनेने केला आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी व नेत्याचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात यावेत, अशी मागणी आज आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली.
मोजे सुस, तालुका मुळशी येथील गट नं सर्वे नं २०४ येथील मिळकतीवर होत असलेले बेकायदेशीर तसेच अनाधिकृत आणि अनैतिक कृत्यांबाबत अतिक्रमण व अवैध धंद्यांविरोधात भीमशक्ती सामाजिक संघटनेने प्रशासनाकडे गेल्या तीन महिन्यांपासून सतत पाठपुरावा केला होता. मात्र, कारवाई न झाल्याने अखेर संघटनेला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला.
या संदर्भात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) आणि पोलिस प्रशासनास अधिकृत पत्रव्यवहार करूनही ठोस निर्णय न झाल्याने, आज सोमवार, दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) कार्यालयाबाहेर आंदोलन छेडण्यात आले. यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष विजय हिंगे व पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सूरज गायकवाड, सीमाताई गायकवाड, प्रतिभा बनसोडे, अलका वायदंडे अर्चना दंडील, विजय ओव्हाळ, आशिष वाघमारे, अक्षय साबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
विजय हिंगे म्हणाले की, अवैध व्यवसायास राजकीय नेत्यांचे पाठबळ मिळत असल्याने कठोर कारवाई होत नाही. त्यामुळे उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांसह दबाव आणणाऱ्या नेत्यावर कारवाई करावी. म्हशीचा गोठा म्हणून जागा ताब्यात घेऊन त्यावर अनधिकृत बांधकाम करत त्याठिकाणी दारू, जुगार, गांजा, अनधिकृत हॉटेल, पानटपरी उभारून तरुण पिढीला बरबाद करण्याचे काम काही समाजकंठक करत आहेत. या अवैध धंद्यांमुळे व अतिक्रमणामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून, याबाबत गेल्या तीन महिन्यांपासून दोन वेळा निवेदन सादर केले असूनही आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे सदर प्रकरणात त्वरित कारवाई व्हावी, यासाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेतर्फे हे आंदोलन करण्यात आले.KK/ML/MS