आंबेत आणि टोळ पुलांच्या कामासाठी निधीची प्रतीक्षा!

 आंबेत आणि टोळ पुलांच्या कामासाठी निधीची प्रतीक्षा!

महाड दि २३ (मिलिंद माने) —
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व कोकणचे सुपुत्र कै. बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांच्या प्रयत्नाने झालेल्या आंबेत व टोळ पूलांचे भवितव्य अंधारात आहे. कालबाह्य झालेले हे पुल नव्याने उभारणीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये उदासीनता असल्याने केवळ दुरुस्तीवरच लाखो रुपये खर्च केले जात आहेत. भविष्यात या मार्गावरील दोन्ही जिल्ह्यातील लोकांना याचा फटका बसणार असून या दोन पुलांच्या उभारणीसाठी राज्य सरकार निधी देणार की केंद्र सरकार याबाबत संभ्रमावस्था आहे.

कोकणातून मुंबईत जाणारा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पूर्वीचा १७ व आत्ताचा ६६ या महामार्गावर असलेला सावित्री नदीवरील पुल २ ऑगस्ट २०१६ रोजी कोसळला होता. महाड तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये तसेच महाबळेश्वर येथे मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाल्याने पूर परिस्थिती पुल कोसळण्याची दुर्घटना घडली होती. या अपघातात एसटी मधून प्रवास करणारे ३२ प्रवासी मृत्युमुखी पडले तर २ खाजगी प्रवासी वाहने देखील नदीपात्रात वाहून गेल्याने त्यामधील तीन प्रवासी मृत्युमुखी पडले होते.

मुंबई व राष्ट्रीय महामार्गावरील सावित्री पूल दुर्घटनेनंतर राज्यातील सर्वच जिल्ह्यातील धोकादायक पूलांचे (अंडरवॉटर सर्वेक्षण) परीक्षण करण्याबाबत राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आदेश दिले होते मात्र त्यानंतर या सर्वेक्षणाच्या अहवालाचे ९ वर्षात काय झाले याचे उत्तर मात्र गुलदस्त्यात आहे. नऊ वर्षात दोन सरकार झाली, दोन सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले मात्र पुण्यातल्या कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पायी साकव कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारला पुन्हा जाग आली आहे.

राज्यातील पुलांचे परीक्षण (अंडरवॉटर सर्वेक्षण)
राज्यातील २०० मीटर पेक्षा जास्त पूलांचे सर्वेक्षण मुख्य अभियंत्यांनी करावे
६० ते२०० मीटर. पर्यंतच्या पुलाचे सर्वेक्षण बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी करावे
३० ते मीटर पर्यंतच्या पूलांचे सर्वेक्षण बांधकाम उपअभियंत्याने करावे
तसेच राज्यमार्ग व ग्रामीण मार्गावरील छोट्या मोर यांचे सर्वेक्षण शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंत्याने करावे.
तसेच प्रत्येक जिल्ह्यासाठी रस्ते दुरुस्ती व देखभालीसाठी उपलब्ध निधी मधील १० टक्के निधी पुलांच्या दुरुस्तीच्या कामासाठी राखीव ठेवावा. मात्र या दहा टक्के निधीवर देखील मागील नऊ वर्षात किती ठिकाणी खर्च झाला ही संशोधनाची बाब आहे. कारण दहा टक्के निधी जर खर्च झाला असता तर पुण्यातील दुर्घटना घडली नसती.

रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या आंबेत व टोळ तसेच महाड मधील दादली पुलाची निर्मिती ही तत्कालीन कोकणचे सुपुत्र व माजी मुख्यमंत्री कै. ए .आर.अंतुले यांनी केली होती आज आंबेत तेथील पुलाला ४७ वर्षे पूर्ण झाली आहेत. सन २०१७/२०१८ मध्ये हा पुल धोकादायक असल्याने त्याची तात्पुरती दुरुस्ती केली होती मात्र २०१९मध्ये वाळू वाहतूक करणाऱ्या बार्ज ने दिलेल्या धडके मध्ये पुलाचा एक खांब सरकल्याने पूर्ण धोकादायक झाला अखेर दोन वर्षांनी या पुलाच्या दुरुस्तीसाठी करोडो रुपये खर्च करून २७ जून
२०२१ रोजी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा हा वाहतुकीसाठी लोकार्पण करण्यात आला.

त्याचप्रमाणे टोळ व दादली पुलाला देखील ४० वर्षाहून अधिक कार्यकाळ झाला मात्र केवळ दादलीपुलाच्या नवीन कामाला मान्यता मिळाली असली तरी आंबेत व टोळ या दोन पुलांच्या नव्या कामाला निधी मंजूर झालेला नाही. पुलांच्या कामासाठी लागणारा करोडो रुपयांचा खर्च राज्य सरकार की केंद्र सरकार करणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

मात्र याबाबत दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मात्र उदासीन असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. कारण दोन्ही ठिकाणी नवीन पूल निर्मितीला किमान तीन वर्षाचा अवधी लागण्याची शक्यता आहे पण मंजुरीला किती काळ लागेल हा देखील प्रश्न. लोकप्रतिनिधींच्या मागणीनंतरच राज्य सरकार या करिता निधी देते की केंद्र सरकारकडे बोट दाखवते हा खरा प्रश्न असल्याने दोन जिल्ह्यातील सीमा वरती भागातील नागरिकांना मात्र तारेवरची कसरत करावी लागणार असल्याची चर्चा दोन्ही जिल्ह्यातील नदीकाठच्या नागरिकांमध्ये चर्चिली जाऊ लागले आहे.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *