एशियाटिक सोसायटीच्या निवडणुकांसाठी सदस्य न्यायालयात

 एशियाटिक सोसायटीच्या निवडणुकांसाठी सदस्य न्यायालयात

मुंबई, दि १६
आर्थिक बेशिस्तीला लगाम, गैरव्यवस्थापनाला पूर्णविराम आणि वैचारिक अस्पृष्यतेची हकालपट्टी या मुद्द्यांना धरून ‘एशियाटिक टुमॉरो’ या नावाने एकत्र आलेल्या सदस्यांनी एशियाटिक सोसायटीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सोसायटीच्या अवैधरित्या प्रलंबित निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत, अशी माहिती सोसायटीचे माजी उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी आज येथे दिली.
एशियाटिक सोसयटीच्या व्यवस्थापनाने निवडणुका एकतर्फी निर्णय घेत अवैधपणे अनिश्चित काळासाठी निवडणुका प्रलंबित केलेल्या असून त्यांच्या चुकीच्या पद्धतीच्या कारभारामुळे देशातील या एका महत्त्वाच्या ज्ञान केंद्राच्या क्षमतांवरच विपरीत परिणाम होत आहे. शिवाय अशा ढिसाळ कारभारामुळे सोसायटीच्या निवडणुका शक्य तितक्या लवकरात लवकर व्हाव्यात याकरिता पुन्हा एकदा न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्या व्यतिरिक्त अन्य पर्याय उपलब्ध राहिलेला नाही. त्यामुळे एक हस्तक्षेप याचिका आज उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असल्याचे डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले.
मुळात सोसायटीच्या नियमांनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेसोबतच निवडणुका घेणे अनिवार्य असताना सध्याच्या व्यवस्थापन मंडळाने ती फारकत केली. त्यानंतर व्यवस्थापनाच्या हडेलहप्पी कारभाराविरोधात सह धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या निर्णयावरील उच्च न्यायालयाच्या एका तांत्रिक स्वरुपाच्या निकालाच्या आड लपत व्यवस्थापनाने ८ नोव्हेंबरपासून निवडणूक पुढे ढकलली. हा एकतर्फी निर्णय होता, तसेच वैधही नव्हता. निवडणुका रोखण्याचा कोणताही हेतू नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट करूनही हा निर्णय घेतला गेला. निवडणुका जाहीर झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या धोरणात्मक निर्णय घेण्याला बंदी असूनही एशियाटिक सोसायटीच्या सध्याच्या व्यवस्थापनाने मुदत संपल्यानंतरही सातत्याने धोरणात्मक निर्णय घेण्याचे सत्र सुरूच ठेवले आहेत. त्यात लाखो रुपयांचा खर्चही करण्यात आलेला आहे. अशा कारभाराबद्दल धर्मादाय आयुक्त तसेच कॅगसारख्या संस्थांनी मागे ताशेरे ओढलेले असूनही व्यवस्थापनाने तसाच कारभार सुरू ठेवला आहे. अशा आर्थिक बेशिस्त व गैरव्यवस्थापनाचे प्रमाण देणाऱ्या कारभाराविरोधात हा लढा असल्याचे ही डॉ. सहस्रबुद्धे यांनी यावेळी निदर्शानास आणून दिले.
मुंबई क्रिकेट असोसिएशनवर ताबा मिळवणयासाठीच्या काही जणांच्या प्रयत्नांना सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच चपराक लगावली. तशाच स्वरुपाचे प्रयत्न एशियाटिक सोसायटीच्या संदर्भातही त्याच व्यक्तिंकडून सुरू आहेत. निवडणुका प्रलंबित राखण्याचे व्यवस्थापनाचे प्रयत्न हे ही त्याच प्रयत्नांचा भाग असण्याची शक्यता आहे, अशी शंका व्यक्त करीत, त्यामुळेच या विरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही डॉ. सहस्रबुद्धे यांनी सांगितले.
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही ढिसाळ प्रशासनाचा परिचय देत व्यवस्थापन फक्त निवडणुका घेऊ शकलेले नाही एवढेच नव्हे, तर निर्दोष मतदार याद्याही तयार करू शकलेले नाही. या अक्षम्य विलंबामुळे आर्थिक वर्ष सरत चालले असून पुढील काळात सोसायटीला निधी मिळण्यातही अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करीत निवडणुका तातडीने होण्याची आवश्यकता डॉ. सहस्रबुद्धे यांनी अधोरेखित केली.
मुंबईचे बौध्दिक वातावरण निकोप रहावे, दुर्गाबाई भागवतांसारख्या विदुषीचे नाव ज्या संस्थेशी जोडले गेले आहे, अशा एशियाटिक सोसायटीसारख्या संस्थेत तरी मराठीची गळचेपी होऊ नये याकरिता एशियाटिक टुमॉरो प्रयत्नशील राहणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *