गडचिरोलीच्या तरुण शेतकऱ्याने पिकवली मोत्याची शेती..

 गडचिरोलीच्या तरुण शेतकऱ्याने पिकवली मोत्याची शेती..

गडचिरोली दि १३:– धान हे मुख्य पीक असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी आता वेगळे प्रयोग करायला लागले आहेत. या जिल्ह्याच्या दक्षिण भागातील राज्याच्या टोकावर असलेल्या सिरोंचा येथील एका तरुण शेतकऱ्यानं आपल्या शेतातील तळ्यात चक्क मोती पिकवले आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात पारंपरिक धानपीकासोबत कापूस आणि मक्याचे पीक घेतले जाते. पण त्यापलिकडचा विचार सहसा कोणता शेतकरी करताना दिसत नाही. सिरोंचा येथील रवी बोंगोनी या तरुण शेतकऱ्यानं मात्र चक्क मोती पिकवण्याचा प्रयोग केला आहे. खरं म्हणजे त्याला मत्स्यसंवर्धनाचे प्रशिक्षण घेण्यासाठी कृषी विभागाने ओरिसातील कटक इथं पाठवले होते. पण उत्सुकता म्हणून त्याने बाजुलाच सुरू असलेल्या मोतीच्या प्रशिक्षणालाही हजेरी लावली आणि आपल्या शेततळ्यात मोती संवर्धन करण्याचा निश्चय केला.

सुरूवातीला पाच लाखाची गुंतवणूक केल्यानंतर त्याला दुप्पट उत्पन्न मिळाले. त्यामुळे ही गुंतवणूक वाढत गेली. आता त्याचा हा प्रयोग पाहण्यासाठी लगतच्या तेलंगणा आणि छत्तीसगडमधूनही शेतकरी येतात.

मोती संवर्धनासोबत त्याच तळ्यात मत्स्यपालनही करत आहे. त्यामुळे या शेतकऱ्याला दुहेरी नफा मिळत आहे. गडचिरोली जिल्ह्यात नैसर्गिकरित्या तळ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे सुरूवातीला थोडी गुंतवणूक करण्याची क्षमता असणारे शेतकरी मोती संवर्धन करू शकतात, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना वाटते.

मोती संवर्धनासाठी पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे असल्याने रवी बोंगोनी याने तळात आठ फूट पाणी साठविले. पाण्यातील चढ-उतार जाणून घेण्यासाठी आठ फूट उंचीपर्यंत पाण्याच्या बाटल्या बसविल्या. हा प्रयोग करताना सुरूवातीला थोडी अडचण गेली, पण बीड येथील कंपनीने शिंपले, जाळे पुरवण्यासोबत परिपक्व झालेले शिंपले खरेदी करण्याची हमी घेतल्याने या शेतकऱ्याची हिंमत वाढली आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *