गोपाळ समाजातील महिला बनली पोलीस निरीक्षक

गोपाळ समाजातील महिला बनली पोलीस निरीक्षक
वाशिम, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम जिल्ह्यातील पार्डी आसरा येथील मूळ रहिवासी असलेल्या क्रांतीका गुलाबराव कालापाड यांची नुकतीच मुंबई येथे पोलीस निरीक्षक पदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे वाशीम जिल्ह्याची मान ऊंचावली असून त्या संबंध महाराष्ट्रातील गोपाळ समाजातील पहिल्या महिला पोलीस निरीक्षक ठरत समाजात त्यांनी हा बहुमान मिळवला आहे.
वाशीम तालुक्यातील पार्डी आसरा येथील रहिवासी असलेले आणि सध्या वाशीम निवासी असलेल्या महाराष्ट्र राज्य गोपाळ समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच महाराष्ट्र बँकेत मुख्य खजिनदार राहिलेले दिवंगत गुलाबराव कालापाड यांची मुलगी असलेल्या क्रांतीका कालापाड यांची मुंबई येथे पोलीस निरीक्षक पदी निवड झाली आहे. यापूर्वी त्या सी आय डी ब्रांच मुंबई येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत होत्या.
सर्वप्रथम २०१० साली एमपीएससीतून त्यांची भंडारा येथे पीएसआय पदी निवड झाली होती. त्यांचे शालेय शिक्षण वाशीम येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे झाले होते. तर आर ए कॉलेज मध्ये त्यांनी बी ए आणि एम ए अर्थशास्त्र आणि इतिहास चे शिक्षण घेतले. नागपूर येथे त्यांनी बी एड ची डिग्री मिळवली. एका सामान्य परंतू शिक्षणाचा वारसा असलेल्या कालापाड कुटुंबाचे नाव त्यांनी उज्वल केले आहे.
भटक्या विमुक्त प्रवर्गात येणाऱ्या गोपाळ समाजात शिक्षणाचे प्रमाण इतर समाजाच्या तुलनेत नगण्य आहे. या समाजातील सरकारी नोकरदारांचे प्रमाण फार कमी आहे. असे असतांना वडिलांचा वारसा आणि गोपाळ समाजातील पहिले डॉक्टरेट असलेले डॉ. रामकृष्ण कालापाड यांचे मार्गदर्शन लाभल्यामुळे क्रांतीका बालपणापासूनच हुशार होत्या. त्यांची पीएसआय पदी निवड झाल्यानंतर आपल्या कुशल कामगिरीमुळे त्यांची बढती होत गेली. आणि नुकतीच त्यांची पदोन्नतीतून पोलीस निरीक्षक पदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे गोपाळ
समाजाचा मान वाढला आहे.
क्रांतीका यांचे पती अमित माने हे मुंबई महानगरपालिकेत लेखाधिकारी आहेत. त्यांची धाकटी बहीण डॉ. सारीका ह्या सोलापूर येथे एमबीबीएस एम एस सर्जन असून तिसरी बहीण डॉ. मोनिका कालापाड ह्या छत्रपती संभाजीनगर येथे एमबीबीएस डॉक्टर आहेत. तर त्यांच्या आई शारदा कालापाड ह्या वाशीम येथील महाराष्ट्र बँकेत मुख्य खजिनदार आहेत. क्रांतीका ह्या समनक जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण कालापाड यांच्या पुतणी आहेत. त्यांच्या या गगनभरारी मुळे पार्डी आसरा या गावासह समाजात सर्व स्तरातून कौतुक होत आहे. A woman from the Gopal community became a police inspector
ML/ML/PGB
15 Jun 2024